एका पोलिस ठाण्यावर ४७ गावांचा भार
जळकोट, ता. १६ (बातमीदार) : मंजूर पदांच्या तुलनेत अत्यल्प मनुष्यबळ उपलब्ध असल्याने जळकोट तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे गुन्ह्यांचा तपास आणि ४७ गावांतील सुरक्षा व्यवस्था सांभाळताना पोलिसांवर ताण येत असून, मंजूर आकृतिबंधानुसार जळकोट पोलिस ठाण्यास पूर्ण मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
जळकोट तालुक्यात एकमेव पोलिस ठाणे असून, ४७ गावांच्या सुरक्षेची जबाबदारी याच ठाण्यावर आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे गंभीर घटनांना प्रतिसाद देणे तसेच दाखल गुन्ह्यांचा तपास करणे अवघड होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जळकोट हा लातूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगतचा, डोंगराळ व दुर्गम तालुका असल्याने या भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसे पोलिस मनुष्यबळ आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भात पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच संबंधित पोलिस प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी काँग्रेसचे युवानेते सचिन केंद्रे, महेश धुळशेट्टे, मेहताब बेग, अक्षय बडगिरे, राम काळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.