
Jalna News : जिल्ह्यात ८४७ गुरुजींची मतदानाला दांडी
जालना - औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (ता.३०) जिल्ह्यात पंधरा केंद्रावर शांततेत मतदान झाले. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाच हजार ३७ गुरुजींपैकी तब्बल ८४७ गुरुजींनी मतदानाचा हक्कच बजावला नाही. त्यामुळे जिल्ह्यात ८३.१८ टक्के मतदान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.
जालना जिल्ह्यातील आकडेवारी
एकूण मतदान केंद्र -१५
मतदार - स्त्री : ८५१, पुरुष : ४१८६, एकूण : ५०३७
झालेले मतदान - स्त्री : ५७६, पुरुष : ३६१४, एकूण : ४१९०
मतदानाची टक्केवारी - स्त्री :६७.६९, पुरुष : ८६.३४
एकूण टक्केवारी ८३.१८
औरंगाबाद शिक्षक मतदार संघाची निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप-बाळासाहेबांची शिवसेना तसेच मित्र पक्ष व संघटनांकडून प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीसाठी दोन पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी जिल्ह्यात प्रचार सभाही घेतल्या होत्या. या प्रचार सभेदरम्यान जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन महाविकास आघाडीसह भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आले होते.
त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवाय शिक्षकांमध्ये उमेदवारांवरून चर्चेचे फड रंगले होते. औरंगाबाद शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात पाच हजार ३७ शिक्षक मतदार आहेत. त्यांपैकी सोमवारी चार हजार १९० शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३ हजार ६१४ पुरुष तर ५७६ महिला शिक्षक मतदारांनी मतदान केले. तर तब्बल ८४७ शिक्षकांनी मतदानाला दांडी मारली. त्यामुळे जिल्ह्यात ८३.१८ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे.
पोलिसांचा बंदोबस्त
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या बंदोबस्त कामी चार उपविभागीय पोलिस अधिकारी, सात पोलिस निरीक्षक, ४० सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, ४५० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.