भूजलपातळी वाढविण्यासाठी ‘जलतारा’ ठरणार आधार!

भूजलपातळी वाढविण्यासाठी ‘जलतारा’ ठरणार आधार!
Published on: 
भूजलपातळी वाढविण्यासाठी ‘जलतारा’ ठरणार आधार! ------ पावसाचा थेंबनथेंब जमिनीत मुरविणार; ३० हजार जलतारा खड्ड्यांचे उद्दिष्ट! ----- हिंगोली, ता. १५ (बातमीदार) : सततची अवर्षणस्थिती आणि पावसाच्या लहरीपणामुळे भूजलपातळी खालावत चालली आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाची टंचाई निर्माण होऊ नये, तसेच पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून भूजलसाठ्यात वाढ व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने जलतारा खड्डेनिर्मिती मोहिमेला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात यंदा तब्बल ३० हजार जलतारा खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी २० हजार खड्ड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेला शेतकऱ्यांचाही प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा सातत्याने अवर्षण व अनियमित पावसाच्या समस्येला सामोरे जात आहे. यंदाही अपेक्षित पाऊस न झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी तब्बल तीन मीटरने खालावली आहे. परिणामी, शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असून, आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरवण्यासाठी व्हीबीजी रामजी योजनेअंतर्गत जलतारा खड्डे तयार करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेसाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एका एकर क्षेत्रात एक जलतारा खड्डा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. प्राप्त अर्जांची आणि खड्ड्यांच्या युनिटची नोंद युक्तधारा पोर्टलवर केली जात आहे. आतापर्यंत सुमारे २० हजार ५६५ खड्ड्यांची नोंद केली आहे. यामध्ये वाढ होणार असून, ३० हजार जलतारा खड्डे तयार करण्याचे नियोजन आहे. ------- विहीर परिसरात तयार करणार खड्डे जलतारा खड्डा हा सिंचन विहिरीच्या परिसरात तयार केला जातो. यासाठी पाच फूट लांब, पाच फूट रुंद आणि सहा फूट खोल खड्डा खोदण्यात येतो. त्यामध्ये पाणी सहजपणे जमिनीत मुरावे, यासाठी तळाशी मोठे दगड, त्यावर मध्यम आकाराचे दगड आणि सर्वांत वर लहान खडी किंवा वाळूचे थर दिले जातात. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी खड्ड्यात साचून हळूहळू जमिनीत झिरपण्यास मदत होते. परिणामी, भूजलपातळी वाढण्यास मदत होते. ---------- एका खड्ड्यासाठी पाच हजारांचे अनुदान व्हीबीजी रामजी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना एका जलतारा खड्ड्यासाठी पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. एका एकर शेती क्षेत्रासाठी एक खड्डा घेता येणार आहे. पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्याच्या या उपक्रमामुळे भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास नक्कीच मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाला आहे. --------- पंचायत समिती स्तरावर आढावा भूजलपातळी वाढविण्यासाठी जलतारा खड्डेनिर्मिती मोहिमेला महत्त्वाची ठरणार असून, जिल्हा प्रशासनाने तालुका स्तरावर पंचायत समित्यांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या पाचही पंचायत समिती यंत्रणांमार्फत आढावा घेण्यात येत असून, गाव स्तरावर ग्रामविकास अधिकारी, अभियंता, रोजगार सेवकांना शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्याचे निर्देश दिले आहेत. -- जिल्ह्यात जलतारा नोंदणीची सद्यःस्थिती तालुका- शेतकरी - जलतारा औंढा नागनाथ- २१६५- ४७९२ वसमत - १९३८- २७६२ हिंगोली -१६३५ - ३९८८ कळमनुरी- १२२०-३२११ सेनगाव - ४९५-९७८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.