जवळा बाजारात झेंडूची ‘दिवाळी गोड’
-
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर आवक घटल्याने दरात तिप्पट उसळी
जवळा बाजार, ता. ९ (बातमीदार) : लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील फुलबाजारात झेंडूच्या फुलांना विक्रमी भाव मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः गोड झाली आहे. रविवारी (ता. आठ) सकाळी अवघ्या ५० रुपये प्रतिकिलो दराने सुरू झालेली विक्री मागणी वाढल्याने सायंकाळपर्यंत थेट १५० रुपयांवर पोचली. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले.
यंदा प्रतिकूल हवामानामुळे बाजारात स्थानिक फुलांची आवक अत्यंत मर्यादित राहिली. यंदा दसऱ्याच्या सणाला झेंडूला प्रतिकिलो अवघा १० ते २० रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही निघाला नव्हता. त्यामुळे दिवाळीत तरी भाव मिळेल का, याबाबत उत्पादकांमध्ये मोठी धाकधूक होती. मात्र, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच दुकानांची सजावट, घरगुती आरास आणि वाहनांच्या पूजनासाठी झेंडूच्या फुलांना जोरदार मागणी राहिली. ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या गर्दीने बाजारपेठ गजबजून गेली होती. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडल्याने दुपारनंतर फुलांच्या दरात चढाओढ सुरू झाली आणि भाव दीडशे रुपयांपर्यंत झेपावले. अखेरच्या टप्प्यात चांगला परतावा हाती आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.