ABD26J83134
जवळा पांचाळ ः परिसरातील शेतात ड्रोनद्वारे पिकांवर औषध फवारणी करताना शेतकरी.
जवळा पांचाळमध्ये शेतीला तंत्रज्ञानाची जोड
ड्रोनद्वारे तूर, हरभरा, हळदीवर औषध फवारणी; वेळेसह पाण्याची बचत
जवळा पांचाळ, ता. १४ (बातमीदार) : कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ आणि परिसरात आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये प्रभावी वापर वाढताना दिसत आहे. सध्याच्या वातावरणातील बदलांमुळे तूर, हरभरा आणि हळद या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव तसेच बुरशीजन्य रोगांचा धोका वाढला आहे. या संकटावर मात करण्यासाठी आणि पिकांच्या संरक्षणासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पद्धतीला फाटा देत ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणीला पसंती दिली आहे.
शेतीमध्ये पारंपरिक पंपाने फवारणी करताना मोठा खर्च, मजुरांची कमतरता आणि अतिरिक्त वेळ लागत असे. मात्र, ड्रोन तंत्रज्ञानामुळे अवघ्या काही मिनिटांत मोठ्या क्षेत्रावर अचूक फवारणी करणे शक्य झाले आहे. यामुळे औषधांचा अपव्यय टळतो आणि पाण्याचीही मोठ्या प्रमाणावर बचत होते. शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि मजुरांची टंचाई लक्षात घेता, हे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. या मोहिमेदरम्यान परिसरातील अनिल गंगेवार, विलास खंडागळे, गोविंद बिलकटे, साईनाथ बिलकटे, गजानन उधाणे, शिवप्रसाद नागनगिरे, रमाकांत नागनगिरे व ओम नागनगिरे यांच्या शेतात ड्रोनद्वारे यशस्वी फवारणी करण्यात आली.
---
प्रतिक्रिया
सध्या तूर, हरभरा आणि हळदीवर किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तातडीने फवारणी करणे गरजेचे होते. ड्रोनमुळे कमी श्रमात आणि कमी वेळेत अचूक फवारणी झाली असून पाण्याचीही मोठी बचत झाली.
- कार्तिक नागनगिरे,
स्थानिक शेतकरी
---
प्रतिक्रिया
पूर्वी पाठीवरील पंपाने फवारणीसाठी मजूर शोधावे लागत आणि दिवस खर्ची पडायचा. आता ड्रोनमुळे काही तासांत सर्व क्षेत्र कव्हर होते. बदलत्या काळात शेतीत असे तंत्रज्ञान वापरणे ही काळाची गरज बनली आहे.
- गोविंद बिलकटे,
शेतकरी
---
प्रतिक्रिया
ड्रोनद्वारे फवारणी करताना पिकांच्या गरजेनुसार पाणी आणि औषधांचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते. औषध पिकांच्या पानांवर पानांखाली समप्रमाणात पोहोचते, ज्यामुळे रोगांचे नियंत्रण प्रभावीपणे होते आणि शेतकऱ्यांचे श्रम वाचतात.
- विजय सातपुते,
ड्रोन चालक