ज्येष्ठांचा ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान
मानसिक आरोग्य व सुरक्षिततेवर कार्यशाळेत सत्कार समारंभ
-----
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १ : सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (मुंबई), प्रादेशिक संसाधन केंद्र (मुंबई) व ज्येष्ठ नागरिक संघ (लातूर) यांच्या वतीने लातुरात ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य व आपत्कालीन परिस्थितीतील सुरक्षितता या विषयावर ज्येष्ठांसाठी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठांच्या योगदानाची आणि भरीव कार्याची दखल घेऊन त्यांचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक उपायुक्त यादव गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशेटवार, डॉ. बी. आर. पाटील, डॉ. माया कुलकर्णी, डॉ. काशिनाथ सलगर, प्रकाश घादगिने, रमेश भोरेकर, प्रकाश नीला, शहाजी घाडगे, वसंत बेडे, नीलिमा येतकर, डॉ. भास्कर बोरगावकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी चंद्रकांत नारायणराव जोशी, व्यंकटराव नारायणराव ढगे, बसवराज विश्वनाथ उटगे, गौतमचंद विठ्ठलराव देशमाने, अशोक गोस्वामी, मंगला सास्तुरकर, चंद्रकांत नारायणराव साळुंखे या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी माता-पिता व ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम २००७ ज्येष्ठ नागरिक न्यायाधीकरणाचे अधिकार कार्यपद्धती व तक्रार निवारण प्रक्रिया या विषयाला धरून ज्येष्ठांना कायद्याविषयी व न्यायाधीन बाबीबाबत सखोल माहिती दिली. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य व भावनिक स्वास्थ्य या विषयावर डॉ. आशिष चेपुरे यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात ज्येष्ठांसाठी आपत्कालीन परिस्थितीतील सुरक्षितता या विषयावर डॉ. ऋषिकेश हरिदास यांनी प्रात्यक्षिकासह संवाद साधला. नीलिमा येतकर यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले. सुनीता बोरगावकर व उषा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. बोरगावकर यांनी आभार मानले.
-----
LTR26B15526
लातूर : जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ नागरिकांसमवेत रोहिणी नऱ्हे-विरोळे, यादव गायकवाड, अविनाश देवशेटवार, डॉ. बी. आर. पाटील, डॉ. माया कुलकर्णी, डॉ. काशिनाथ सलगर, प्रकाश घादगिने.