बांगडी मागताच सराफा व्यापारी गायब
दुकान बंद, मोठ्या करण्यासाठी दिल्या होत्या बांगड्या, सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद
छत्रपती संभाजीनगर, ता. १९ : बांगड्या मोठ्या करण्यासाठी सराफा व्यापऱ्याकडे दिल्या. परत मागितल्या तर एकच दिली. दुसऱ्या बांगडीसाठी तीन महिने चकरा मारायला लावल्या. वाद झाले, महिलेला शिवीगाळ झाली. त्यानंतर एक तारीख ठरली. त्या तारखेला महिला बांगडी आणायला गेली तर दुकान बंद होते. सराफा व्यापारी त्या परिसरातून गायब झाला होता. हा प्रकार शहरातील केळी बाजार परिसरात घडला. ४ लाख ६५ हजार रुपये किमतीची ३० ग्रॅमची बांगडी घेऊस पसार झाल्याप्रकरणी एस.एम. ज्वेलर्सच्या व्यापाऱ्यावर सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
घटनेनंतर या प्रकरणात संघमित्रा ऊर्फ संगीता रमेश शिरसाठ (५८, रा. जिजाऊ भोसले कॉलनी, जटवाडा रोड) यांनी फिर्याद दिली. शिरसाठ यांनी १६ नोव्हेंबर २०२२ मध्ये एस.एम. ज्वेलर्समधून सोन्याच्या दोन बांगड्या खरेदी केल्या होत्या. त्यांचे एकूण वजन ६० ग्रॅम होते. बांगड्या लहान होत असल्याने त्यांनी त्या मोठ्या करण्यासाठी १४ डिसेंबर २०२५ ला परत दुकानात दिल्या. त्यावेळी २३ डिसेंबरला बांगड्या परत देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, ठरलेल्या दिवशी बांगड्या मुंबईला घडविण्यासाठी पाठवल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर जानेवारीतही बांगड्या परत मिळाल्या नाहीत. अखेर २० फेब्रुवारीला ३० ग्रॅम वजनाची एक बांगडी देण्यात आली. उर्वरित बांगडी नंतर देण्याचे सांगण्यात आले.
----
बांगडी मागताच वाद
शिरसाठ या मेहुणे दिगंबर पाईकडे यांच्यासोबत उर्वरित बांगडी घेण्यासाठी १९ मार्चला पुन्हा दुकानात पोचल्या. त्यावेळी बांगडीचे पॉलिश अजून झाले नसल्याचे सांगून दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. तीन महिने उलटूनही बांगडी मिळाली नसल्याने शिरसाठ यांनी त्याच दिवशी बांगडी देण्याचा आग्रह धरला. यावर रौनक संचेती याने बांगडी देणार नसल्याचे सांगत पुन्हा दुकानात आल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
----
आश्वासन दिने अन् दुकान बंद करून गेले
वादावादीनंतर संचेती यांनी उर्वरित ३० ग्रॅमची बांगडी २३ मार्चला देण्याचे दुकानाच्या लेटरहेडवर लिहून दिले होते. मात्र, त्या दिवशी तेथे गेले असता दुकान बंद दिसून आले. ३१ मार्चलाही दुकान बंद होते. याबाबत शिरसाठ यांनी परिसरात चौकशी केली, तेव्हा संचेती दुकान बंद करून गेल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सिटी चौक पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास उपनिरीक्षक बुधा शिंदे करत आहेत.