‘सचखंड’मधून सोळा
लाखांचे दागिने लंपास
-चोरट्याने व्यापाऱ्याची ट्रॉलीबॅग पळविली
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ३ : नांदेडहून आग्र्याकडे जाणाऱ्या सचखंड एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या चांदी व्यापाऱ्याची सोन्या-चांदीचे सुमारे १५ लाख ८० हजार रुपये किमतीचे दागिने असलेली ट्रॉली बॅग चोरट्याने लंपास केल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी घडली. परभणी स्थानकातून रेल्वे पुढे गेल्यानंतर प्रवाशाला बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन धरमप्रकाश गुप्ता यांनी याबाबत तक्रार दिली. गुप्ता हे चांदीचा व्यापार करतात. व्यापारानिमित्त ते १९ ऑगस्ट रोजी नांदेडात आले होते. चांदीची खरेदी-विक्री केल्यानंतर २५ ऑगस्ट रोजी ते सचखंड एक्स्प्रेसने नांदेडहून आग्र्याकडे जाण्यासाठी रवाना झाले. प्रवासादरम्यान गुप्ता यांना झोप लागली. काही वेळाने त्यांना जाग आली. त्यावेळी रेल्वे परभणी स्थानकातून पुढे गेली होती. त्यांनी जवळ ठेवलेली ट्रॉली बॅग पाहिली असता ती जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. झोप लागल्याचे पाहून चोरट्याने बॅग लंपास केल्याचा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. या ट्रॉली बॅगेत सोन्या-चांदीचे दागिने होते. त्यांची एकूण किंमत १५ लाख ८० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे. गुप्ता यांनी घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना दिल्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
---
चोरी नेमकी कुठे?
परभणी स्थानकातून रेल्वे पुढे गेल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आल्याने ही चोरी नेमकी कोणत्या ठिकाणी झाली, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. रेल्वेतील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य उपलब्ध माहितीच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
.................................