नोकरीच्या आमिषाने एक कोटी १३ लाखांचा गंडा
--
उदगीर शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
--
उदगीर, ता. १० (बातमीदार) : ग्रॅव्हिटी प्लेसमेंट अँड मॅनेजमेंटच्या माध्यमातून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीसह इतरांची तब्बल एक कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उदगीर शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रतीक्षा ज्ञानेश्वर राजुरे (वय २९, रा. रामरक्षा निवास, नई आबादी, उदगीर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. अभय प्रताप शर्मा (रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश), दशरथ विठ्ठल जाधव (रा. शिक्षक कॉलनी, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि सचिन शिवराम धमाले (रा. वडगाव कोल्हाटी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, १३ ऑगस्ट २०२५ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संबंधित आरोपींनी संगनमत करून ग्रॅव्हिटी प्लेसमेंट अँड मॅनेजमेंटच्या माध्यमातून नोकरी लावून देण्याचे आमिष फिर्यादी व इतर साक्षीदारांना दाखविले. या आमिषातून त्यांची एकूण एक कोटी १३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी नऊ ऑक्टोबरला उदगीर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.