गैरसमजातून पत्रकाराला मारहाण; दोन मुलांनाही धमकी
छत्रपती संभाजीनगर : पत्रकार परिषद आटोपून बाहेर पडताना पैशांच्या मागणीवरून झालेल्या गैरसमजातून पाच जणांनी पत्रकाराला मारहाण केल्याची घटना भाग्यनगरातील पत्रकार भवन परिसरात घडली. वडिलांना सोडविण्यासाठी धावलेल्या त्यांच्या दोन मुलांनाही आरोपींनी मारहाण करून पोलिसांत तक्रार केल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
बबन विश्वनाथ सोनवणे, विजय विश्वनाथ सोनवणे, यश विजय सोनवणे, सिद्धार्थ विश्वनाथ सोनवणे आणि आदर्श सिद्धार्थ सोनवणे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. गजानन बोदडे (६६, रा. आविष्कार कॉलनी, एन-६ सिडको) यांनी फिर्याद दिली. तक्रारीनुसार, ६ सप्टेंबरला पत्रकार भवनात पत्रकार परिषद झाली. परिषद संपल्यानंतर बबन सोनवणे याने संयोजक प्रकाश कांकरिया यांच्याकडे पैशांची मागणी केली. कांकरिया यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर बोदडे यांनीच पैसे देऊ नका, असे सांगितल्याचा सोनवणे याचा गैरसमज झाला. त्यातून त्याने बोदडे यांना शिवीगाळ करून मानगुटीला धरत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर अन्य चार जणांनीही बोदडे यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास हवालदार साहेबराव चव्हाण करीत आहेत.
----
११२ डायलनंतर पोलिस घटनास्थळी
वडिलांना वाचविण्यासाठी गेलेल्या तथागत व निर्मिक बोदडे यांनाही मारहाण करण्यात आली. घटनेदरम्यान ११२ क्रमांकावर फोन करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर बोदडे यांनी तक्रार दिली.