ज्वारीच्या दराने खाल्ली उचल
----
किरकोळ बाजारात १०० रुपये किलो, बाजार समितीत आवक ठप्प
----
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २६ ः रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरण्या संकटात सापडल्याने आणि येणाऱ्या काळात उत्पादनात मोठी घट होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने, बाजारात ज्वारीच्या दरांनी अचानक मोठी उसळी मारली आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी बाजार समित्यांमध्ये पाच हजार रुपये प्रतिक्विंटल असणारे ज्वारीचे दर आता वाणानुसार थेट सात हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत.
धाराशिव बाजार समितीत ज्वारीची आवक जवळपास पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी बाजार समितीतून ज्वारी खरेदी करून आणत आहेत आणि जिल्ह्यातील आठवडे व किरकोळ बाजारात विक्री करत आहेत. यामुळे किरकोळ बाजारात ज्वारी ९० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विकावी लागत आहे. स्वतः शेतकऱ्यांकडेही ज्वारीचा फारसा साठा शिल्लक राहिलेला नाही. ज्यांच्याकडे थोडाफार साठा आहे, तो त्यांनी वर्षाच्या कुटुंबाच्या खाण्यासाठी राखून ठेवला आहे. बाजारात ज्वारीची आवक पूर्णपणे थांबल्यानेच दरांनी उसळी घेतली आहे.
-------
((पॉइंटर))
वाणानुसार ज्वारीचे दर (प्रतिक्विंटल, रुपये)
- जूट वाण : ९,००० ते १०,०००
- मालदांडी : ८,००० ते ९,०००
- इतर वाण : ७,००० ते ८,०००
-----
((कोट))
बाजार समितीत ज्वारीची आवक खूपच कमी आहे. सध्या रोज अवघे १०० ते १२५ कट्टेच येत आहेत. धाराशिवमधून तर अजिबात आवक नाही; उलट धाराशिवचे व्यापारी येथून ज्वारी नेऊन तिथे किरकोळ बाजारात विकत आहेत. वाणानुसार सात हजार ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर सुरू आहे.
- तानाजी मिठे, आडतदार, बार्शी बाजार समिती
-----
((कोट))
बाजार समितीत ज्वारीची आवक शून्य आहे. रब्बीच्या पेरण्याच नाहीत, तर ज्वारी बाजारात येणार कुठून? माझ्या स्वतःच्या घरीसुद्धा ज्वारी शिल्लक नाही. थोडी पाण्याची सोय असल्याने सव्वा एकर पेरणी केली खरी, पण ते पीक हाती येईपर्यंत काही सांगता येत नाही. इतर शेतकऱ्यांनी तर पेरण्याच केलेल्या नाहीत. म्हणूनच दरांमध्ये ही वाढ झाली आहे.
- सूर्यकांत माने, सचिव, धाराशिव बाजार समिती