न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव
परभणी, ता. २२ : न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा १७ सप्टेंबर रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल, कल्याणनगर, परभणी येथे उत्साहात पार पडला. गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. सादरानी, जिल्हा न्यायाधीश त्रिभुवन, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यंगडे आणि मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एम. वर्मा उपस्थित होते. यावेळी न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी या सत्कार सोहळ्यातून प्रेरणा घेऊन जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर उच्च शिक्षण घेऊन विविध मोठ्या पदांवर कार्यरत व्हावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास राजकुमार गायके, संजय वाघमारे, भारत खांडे, प्रमोद कदम, अमृत कदम, बाबूराव राठोड, शिवकुमार नळगीरकर, नरंगले, कांबळे, संतोष वाडेकर, साहेबराव जोंधळे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन अमृतराव कदम यांनी केले. पुरुषोत्तम बोरवंडकर यांनी आभार मानले.