पठारे यांना न्याय देण्याची मागणी
सोनपेठ येथे समाजबांधवांकडून प्रशासनास निवेदन सादर
सोनपेठ, ता.१७ (बातमीदार) : वैजापूर तालुक्यातील रोहित पठारे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत त्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी सोनपेठ येथील आरक्षण उपवर्गीकरण महामोर्चा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात ॲड. सिद्धांत शिरसाट व सहकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
वैजापूर तालुक्यातील रोहित पठारे यांची झालेली निर्घृण हत्या ही केवळ एका व्यक्तीवरील हल्ल्याची घटना नसून समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणारी आहे. अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या घटनेमुळे एका कुटुंबाचा आधार हरपला असून संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे केवळ आश्वासने न देता शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात. पीडित कुटुंबाचे योग्य पुनर्वसन करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
या निवेदनावर ॲड. सिद्धांत शिरसाट, मारुती रंजवे, गौतम उजगरे, सोपान रणदिवे, रामेश्वर पंडित, हनुमान पंडित, सुनील प्रधान, कल्याण वाघमारे, बेगराज मस्के आणि आत्माराम रणखांबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.