विभागीय कबड्डीत ‘बोगस’
खेळाडूंच्या सहभागाचा आरोप
पैठण, ता. १४ (बातमीदार) : हिंगोली येथे झालेल्या १४ वर्षांखालील विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेत तेथील जिल्हा संघातील काही खेळाडूंनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वय कमी दाखवून सहभाग घेतल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व संशयित खेळाडूंची वैद्यकीय वय पडताळणी चाचणी घ्यावी, अशी मागणी पैठणच्या भीमाशंकर विद्यालयाचे सहशिक्षक एस.के. बदर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शालेय क्रीडा स्पर्धांतर्गत ही विभागीय स्पर्धा २६ व २७ ऑक्टोबर रोजी डिग्रस फाटा (हिंगोली) येथे पार पडली. संबंधित खेळाडूंचे वय कमी दाखवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करत, डीएसओ पोर्टलवरील नोंदी व पुरावे क्रीडा उपसंचालक (छत्रपती संभाजीनगर) यांच्याकडे सादर केले आहेत. गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधित शाळा व क्रीडा शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी केली असून, याच्या प्रती क्रीडा संचालनालय (पुणे) येथेही पाठवण्यात आल्या आहेत.
प्रतिक्रिया
वयोमर्यादेचे उल्लंघन करून अधिक वयाचे खेळाडू खेळवणे हा पात्र व होतकरू खेळाडूंवर घोर अन्याय आहे. या प्रकरणाची निष्पक्ष तपासणी करून खऱ्या खेळाडूंना न्याय द्यावा.
- एस. के. बदर,
सहशिक्षक, भीमाशंकर विद्यालय
प्रतिक्रिया
केवळ शाळेच्या प्रतिष्ठेसाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी अशा बोगस खेळाडूंना मैदानात उतरवू नये. क्रीडा विभागाने न्याय दिला नाही, तर आम्ही न्यायालयात कायदेशीर लढा देऊ.
- स्वप्नील चाळक,
पालक