कडोळी-माझोड शिव रस्त्याचा
प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
-
सेनगाव, ता. १५ (बातमीदार) : तालुक्यातील कडोळी येथील प्रलंबित शेत रस्ता आणि पाणंद रस्ता प्रश्न आगामी १५ दिवसांत मार्गी लावा, अन्यथा २१ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा कडोळी येथील अरविंद भाकरे यांनी दिला. या संदर्भातील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले की, कडोळी येथील कडोळी ते आजेगाव (पाण्याच्या टाकीपासून ते माझोड शिव) हा अंदाजे २ किलोमीटरचा पाणंद रस्ता प्रलंबित आहे. तसेच कडोळी ते कोकलगाव शेती गट नकाशात उकलगावास नोंद असलेला आणि गुप्तलिंग महादेव संस्थान नोंद असलेला शेत-रस्ता, ज्याचा प्रस्ताव २०२१ मध्ये सादर करण्यात आला होता, तो अद्याप प्रलंबित आहे. या दोन्ही प्रकरणांबाबत प्रशासनाला वारंवार कळवून आणि संबंधित प्रस्ताव ग्रामपंचायत कार्यालय, कडोळीमार्फत २०२१ मध्येच सादर करून नियमाप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया राबवलेली आहे. असे असतानाही हेतुपूर्वक योग्य ती कार्यवाही होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा केला जात आहे.
-------------------
सरस्वती महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिर
जवळा बाजार, ता. १५ : भारत निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात मतदार नोंदणी विशेष शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील डुकरे होते.
औंढा नागनाथ तहसील कार्यालयाच्या पुढाकारातून हे शिबिर घेण्यात आले. यावेळी पात्र विद्यार्थ्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी तसेच मतदार यादीतील नावांबाबत दावे व हरकती नोंदविण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, मतदानाचे महत्त्व जाणून घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक मनोज कांबळे, सरस्वती प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पवार, जवळा बाजार येथील बी.एल.ओ. श्री. मुळे, गणू वैद्य, प्रभाकर सोनवणे, ओम दशरथे, उमेश मुधळ, प्रा. प्रेम राठोड, वंजे पंकज उपस्थित होते. प्रभाकर सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. बी.एल.ओ. सुबोध मुळे यांनी प्रास्ताविक केले. ओम दशरथे यांनी सूत्रसंचालन तर प्राचार्य सुनील डुकरे यांनी आभार मानले.
--------------------------------------------
हट्ट्यात पिकांचे पंचनामे पूर्ण
हट्टा, ता. १५ (बातमीदार) ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग आला आहे. परिसरात तलाठी नवनाथ निर्मले, कृषी सहायक वंदना खाडे, ग्रामसेवक संजय कातोरे यांनी हट्टा व परिसरातील पिकांचे पंचनामे केले. यावेळी माजी सरपंच दीपक हातागळे, पुष्पक देशमुख, गोविंद देशमुख, बालासाहेब चट्टे, श्यामराव देशपांडे, प्रसाद देशमुख, शिवाजी देशमुख, रावसाहेब ढगे, गजानन देशमुख, रमेश धोत्रे, यशवंत खाडे, सुरज चट्टे, श्रीकांत देशमुख, बालू ढगे, कल्याण ढगे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.