कडोळी मंदिर विकासकामांच्या चौकशीला वेग

कडोळी मंदिर विकासकामांच्या चौकशीला वेग
Published on: 
कडोळी मंदिर विकासकामांच्या चौकशीला वेग ---- ५० लाखांच्या कामावर आक्षेप; पेव्हरब्लॉक कामाचीही होणार चौकशी ----- सेनगाव, ता. १५ (बातमीदार) : तालुक्यातील कडोळी येथील श्री रमतेराम महाराज महादेव मंदिर संस्थानच्या विकासकामांबाबत झालेल्या तक्रारींच्या चौकशीला वेग आला आहे. शासनाच्या एक कोटी रुपयांच्या प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून करण्यात आलेल्या ५० लाख रुपये खर्चाच्या विद्युतीकरण कामांची स्वतंत्र व त्रयस्थ यंत्रणेमार्फत तांत्रिक तपासणी करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, पेव्हरब्लॉक कामाच्या चौकशीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून, तो दोन-तीन दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर होण्याची शक्यता आहे. भारतरत्न नानाजी देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या कडोळी येथील मंदिर संस्थानच्या विकासासाठी शासनाने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून झालेल्या विविध कामांच्या दर्जाबाबत व खर्चाबाबत अनियमितता झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. त्याची दखल घेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. विद्युतीकरण कामांबाबत तक्रारदारांनी विशेष आक्षेप नोंदवले आहेत. प्रत्यक्ष कामाची सद्यःस्थिती, कामाचे प्रमाण, गुणवत्ता तसेच सादर केलेल्या चालू देयकांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. काम पूर्ण होण्यापूर्वी वाढीव देयके काढण्यात आली आहेत का, असा सवालही उपस्थित करण्यात आला. यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेतील स्वतंत्र अभियंत्यांमार्फत तपासणी करण्याची मागणी आहे. दरम्यान, पेव्हरब्लॉक कामाची समितीने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक माहिती व नमुने संकलित केले. अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून, त्यातून जबाबदारी निश्चित होते का, याकडे तालुक्याचे लक्ष आहे. ------- ((कोट)) श्री रमतेराम महाराज महादेव मंदिर संस्थान हे पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भाविक येथे श्रद्धेपोटी स्वेच्छेने लाखोंच्या देणग्या देतात. अशा पवित्र ठिकाणच्या विकासकामांच्या निधी वापरात अनियमितता झाल्याच्या तक्रारी येत असतील, तर प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक व निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. - अरविंद भाकरे, माजी ग्रा.पं. सदस्य, कडोळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.