कळंब तालुक्यात ६६ हजार ८७७ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण
९७ गावांतील ६३ हजार ६९० शेतकऱ्यांचा समावेश; अहवाल सादर, अनुदानाची प्रतीक्षा
-------------
दिलीप गंभिरे
कळंब, ता. ३ : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने कळंब तालुक्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी पिके करपल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. या दुष्काळी परिस्थितीची दखल घेत शासनाच्या निर्देशानुसार नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. तालुक्यातील आठ महसूल मंडळांमधील ९७ गावांतील तब्बल ६६ हजार ८७७ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले असून, त्यात ६३ हजार ६९० शेतकऱ्यांचा समावेश आहे. पंचनामे पूर्ण झाले, आता प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
कळंब तालुका शंभर टक्के दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी नुकसानीच्या पंचनाम्यांच्या याद्यांचे काम पूर्ण झाले असून, संबंधित याद्या पुढील जिल्हास्तरीय कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष दुष्काळी अनुदानाच्या प्रत्यक्ष वितरणाकडे लागले आहे.
तालुक्यातील खरीप पिकांमध्ये ६५ हजार २१ हेक्टर सोयाबीन, ९२० हेक्टर तूर, २७७ हेक्टर उडीद आणि ६५९ हेक्टर इतर पिकांचा समावेश आहे. याशिवाय ५ हजार २६० हेक्टर ऊस, ४.४६ हेक्टर कांदा, १४.९२ हेक्टर भाजीपाला आणि ६.१० हेक्टर इतर पिकांचेही पंचनामे करण्यात आले आहेत. केळी, डाळिंब, पेरू, द्राक्षे आणि लिंबू या फळपिकांखालील १२५ हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महसूल विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत पंचनामे करण्यात आले. गावनिहाय आणि क्षेत्रनिहाय पिकांची पाहणी करून क्षेत्र, पिकांची सद्यःस्थिती आणि झालेल्या नुकसानीची नोंद घेण्यात आली. ९७ गावांतील पंचनामे पूर्ण झाल्याने आता जिल्हास्तरावर पुढील कार्यवाही होणार आहे.
पंचनामे पूर्ण; अनुदानाची प्रतीक्षा
पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मिळणारी दुष्काळी मदत महत्त्वाची ठरणार आहे. पंचनामे पूर्ण झाले असले तरी अनुदानाची रक्कम प्रत्यक्ष बँक खात्यात जमा झाल्यानंतरच मदतीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनाम्यानंतरची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून अनुदान वितरणाला गती द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
हेक्टरी मदतीचे प्रस्तावित दर
स्थानिक प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांमध्ये जिरायती, बागायती आणि फळपिकांचे स्वतंत्र वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार जिरायती पिकांसाठी हेक्टरी आठ हजार ५०० रुपये, बागायती पिकांसाठी १७ हजार रुपये, तर फळपिकांसाठी हेक्टरी २२ हजार ५०० रुपये मदतीचा अहवाल पाठविण्यात आला आहे.
-----------
तालुक्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामात सोयाबीनचे पीक घेतात. त्यात जिरायती क्षेत्राचे प्रमाण अधिक आहे. पावसाअभावी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हेक्टरी मिळणारी मदत नुकसानीच्या तुलनेत तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
- भागवत सोमासे, शेतकरी, पिंपळगाव