३२ कोटींची मदत मिळणार;७,२०८ शेतकरी अॅग्रीस्टॅकच्या कचाट्यात! कळंब तालुक्यातील ६४ हजार ७९१ शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये; नोंदणी अपूर्ण असल्याने तीन कोटी ६० लाखांचे वाटप रखडण्याची शक्यता

३२ कोटींची मदत मिळणार;७,२०८ शेतकरी अॅग्रीस्टॅकच्या कचाट्यात!  कळंब तालुक्यातील ६४ हजार ७९१ शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये; नोंदणी अपूर्ण असल्याने तीन कोटी ६० लाखांचे वाटप रखडण्याची शक्यता
Published on: 
सात हजार शेतकऱ्यांना ‘फार्मर’चा अडसर! कळंब तालुक्यात ३२ कोटींची अग्रीम मदत अपेक्षित कळंब, ता. ३० (बातमीदार) : दुष्काळाने खरीप हंगाम उद्ध्वस्त केला, आर्थिक संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आणि आता दिवाळीच्या तोंडावर जाहीर झालेल्या मदतीसाठी फार्मर आयडीचा अडसर निर्माण झाला आहे. कळंब तालुक्यातील ६४ हजार ७९१ शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण ३२ कोटी ३९ लाख ५५ हजार रुपयांची अग्रीम मदत मिळणार आहे. मात्र, तब्बल सात हजार २०८ शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकअंतर्गत नोंदणी अपूर्ण असल्याने सुमारे तीन कोटी ६० लाख ४० हजार रुपयांचे मदत वाटप रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मदतीची घोषणा होऊनही प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा होईपर्यंत शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रीम मदत देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार असून, ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शुक्रवारपासून (ता. ३०) मदत वाटप सुरू होण्याची शक्यता आहे. मदतीची घोषणा; नोंदणीचा अडसर! खरीप हंगामातील नुकसान आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी मिळणारी पाच हजार रुपयांची मदत महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, फार्मर आयडी तयार नसलेल्या शेतकऱ्यांसमोर मदतीचा लाभ मिळविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तांत्रिक अडथळ्यांमुळे पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ................... ((कोट)) शासनाच्या विविध कृषी योजना आणि योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत सुलभतेने पोचविण्यासाठी फार्मर आयडी महत्त्वाची आहे. त्यामुळे तालुक्यातील फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांनी आपली फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्यावी. फार्मर आयडी तयार करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या शेतकऱ्यांची अद्याप फार्मर आयडी तयार झालेली नाही, त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. - मारुती ओव्हाळ, तालुका कृषी अधिकारी, कळंब