कळंब तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींवर प्रशासक
सरपंचांचा कार्यकाळ संपल्याने ग्रामपंचायतींचा कारभार अधिकाऱ्याकडे
-----
कळंब, ता. १७ (बातमीदार) : कळंब तालुक्यातील मुदत संपलेल्या ६० ग्रामपंचायतींचा कारभार आता विस्तार अधिकारी, शाखा अभियंता व अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे सोपविण्यात आला आहे. ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याबाबत शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे, या ६० ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार तीन ते सहा ग्रामपंचायतींच्या गटाने विविध अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांसाठी किंवा संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत प्रशासकांचा कार्यकाळ राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. कळंब तालुक्यात एकूण ९४ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ६० ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी-मार्चमध्ये संपली होती. निवडणुका झालेल्या नसल्याने सुरवातीला संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या नियुक्तीला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर ऑगस्टअखेरीस सरपंचांचा प्रशासक म्हणून कार्यकाळ संपुष्टात आला.
त्यामुळे ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाला होता. रोजगार हमी योजनेतील वैयक्तिक लाभाच्या योजनांचे पैसे ग्रामपंचायतींच्या बँक खात्यांमध्ये जमा झाले होते. मात्र, आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार असलेले प्रशासक नियुक्त नसल्याने लाभार्थ्यांना निधी मिळण्यात तसेच विविध विकासकामांच्या व्यवहारांत अडचणी निर्माण झाल्या होत्या.