(((((दिवाळी अंकासाठी लेख))))
----
ऐतिहासिक वैभव; मात्र कंधारची विकासाच्या बाबतीत उपेक्षाच
नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलेले कंधार शहर आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. राष्ट्रकुट राजांच्या राजधानीचा ऐतिहासिक वारसा मिरवणाऱ्या या शहराच्या पदरी मात्र उपेक्षाच पडल्याचे चित्र आहे. शहराला ऐतिहासिक ओळख आहे, धार्मिक महत्त्व आहे, नैसर्गिक आणि स्थापत्यकलेचा अनमोल ठेवा आहे; मात्र या वैभवाचे आर्थिक विकासात रूपांतर करण्यात आजवरच्या लोकप्रतिनिधींना यश आलेले नाही. राष्ट्रीय महामार्गापासून दूर राहिल्याने दळणवळणाच्या दृष्टीने शहर मागे पडले, तर उद्योगधंद्यांचा अभाव आणि रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे तरुणाईसमोर भविष्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे ऐतिहासिक वारशाचा अभिमान आणि दुसरीकडे मूलभूत विकासासाठी सुरू असलेली धडपड, अशा विरोधाभासी परिस्थितीत कंधारकरांची वाटचाल सुरू आहे.
-हफीज घडीवाला, कंधार
-----
कंधार शहराला राष्ट्रकुट राजांच्या राजधानीचा गौरवशाली इतिहास लाभला आहे. शहरातील राष्ट्रकूटकालीन भुईकोट किल्ला आजही त्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देत उभा आहे. सुफीसंत हजरत हाजी सय्याह यांच्या दर्ग्यामुळे शहराला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला जगतुंग समुद्र (तलाव) हे कंधारच्या ऐतिहासिक आणि स्थापत्यवैभवाचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. या वास्तू आणि ऐतिहासिक ठेव्याच्या माध्यमातून कंधारला पर्यटनाच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून देण्याची मोठी संधी आहे. मात्र, या संधीचे सोने करण्यासाठी आवश्यक असलेले नियोजन, पर्यटन सुविधा, प्रसिद्धी आणि पायाभूत विकास यांचा अभाव जाणवतो.
शहराच्या विकासातील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडणी नसणे. महामार्ग हे केवळ वाहतुकीचे साधन नसून व्यापार, उद्योग, रोजगार आणि आर्थिक उलाढालीचे प्रवेशद्वार असतात. एखाद्या शहरातून महामार्ग गेल्यास त्या परिसरात बाजारपेठा, व्यावसायिक प्रतिष्ठाने, वाहतूक व्यवसाय आणि लघुउद्योगांना चालना मिळते. मात्र, कंधारला या विकासाच्या संधीपासून वंचित राहावे लागले आहे. शहरातून राष्ट्रीय महामार्ग जावा, यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रभावी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा झाल्याचे ठोस चित्र दिसून येत नाही. परिणामी, भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान असूनही कंधारची वाहतूक आणि व्यापाराच्या दृष्टीने पीछेहाट झाली आहे. विशेष म्हणजे, लोहा ते मुखेड हा राज्य मार्ग कंधार शहरातून नेण्याची संधी होती. मात्र, हा मार्ग शहरातून न नेता जवळपास तीन किलोमीटर अंतरावरून मुखेड फाटा ते घोडज-शेकापूर असा नेण्यात आला. हा मार्ग कंधार शहरातून गेला असता तर शहराला महामार्गासारख्या दळणवळण सुविधेचा लाभ मिळाला असता. शहरातील व्यापारपेठेला चालना मिळाली असती, प्रवासी वाहतूक वाढली असती आणि परिसरातील गावांशी आर्थिक संपर्क अधिक मजबूत झाला असता. परंतु, दीर्घकालीन विकासाचा विचार करून निर्णय घेण्याची दूरदृष्टी लोकप्रतिनिधींनी दाखवली नाही, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. तीन किलोमीटरच्या अंतराने शहराच्या विकासाच्या संधी किती दूर गेल्या, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. कंधार शहरातील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे उद्योगधंद्यांचा अभाव. शहर आणि तालुक्यात रोजगारनिर्मिती करणारे मोठे उद्योग, प्रक्रिया उद्योग किंवा औद्योगिक वसाहतींचा विस्तार झालेला नाही. परिणामी, उच्चशिक्षित तरुणांपासून अल्पशिक्षित युवकांपर्यंत अनेकांना रोजगारासाठी नांदेड, लातूर, पुणे, मुंबई तसेच इतर मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी नसल्याने तरुणांचे स्थलांतर वाढत आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेला पूरक व्यवसायांची जोड मिळत नसल्याने आर्थिक विकासालाही मर्यादा पडत आहेत.
कंधारमध्ये कृषिपूरक उद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग, शीतगृहे, डाळ मिल, तेल गिरण्या, फळप्रक्रिया केंद्रे आणि लघुउद्योग उभारण्यास मोठा वाव आहे. तालुक्यातील कृषी उत्पादन, गावरान सीताफळासारखी स्थानिक फळे आणि उपलब्ध मनुष्यबळ यांचा विचार करता प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळेल आणि स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. यासाठी औद्योगिक वसाहतीची निर्मिती, गुंतवणूकदारांना प्रोत्साहन आणि शासकीय योजनांचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करताना अंतर्गत भागांतील मूलभूत सुविधांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. भीमगड परिसरातील रस्त्यांचा प्रश्न अनेक दिवसांपासून नागरिकांसमोर उभा आहे. तर आसान नगर परिसरात रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात विकासाच्या घोषणा होत असताना उपनगरांतील नागरिकांना मात्र मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, सार्वजनिक प्रकाशव्यवस्था आणि आरोग्य सुविधा या नागरिकांच्या प्राथमिक गरजा आहेत. विकासाच्या कोणत्याही आराखड्यात या प्रश्नांना प्राधान्य मिळणे आवश्यक आहे.
----
बाजारपेठेला पुन्हा उभारी मिळू शकेल?
कंधारचा भुईकोट किल्ला, जगतुंग समुद्र आणि हजरत हाजी सय्याह दर्गा ही ठिकाणे पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकतात. या ठिकाणांचे संवर्धन, सुशोभीकरण, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा, माहिती केंद्र, मार्गदर्शक व्यवस्था आणि पर्यटन प्रसिद्धी यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याची गरज आहे. ऐतिहासिक वारशाचे जतन करतानाच त्यातून स्थानिक रोजगारनिर्मिती होऊ शकते. पर्यटन वाढल्यास हॉटेल व्यवसाय, वाहतूक, स्थानिक उत्पादने आणि छोट्या व्यावसायिकांना आर्थिक संधी उपलब्ध होतील. एकेकाळी परिसरातील गावांसाठी महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या कंधार शहराची आर्थिक घडी आता विस्कळीत होताना दिसत आहे. मोठ्या व्यापारपेठेचा अभाव, उद्योगधंद्यांची कमतरता आणि महामार्गाशी थेट संपर्क नसल्यामुळे शहरातील आर्थिक उलाढालीवर मर्यादा आल्या आहेत. सायंकाळनंतर बाजारपेठेत अपेक्षित वर्दळ दिसत नाही. त्यामुळे ''सातच्या आत घरात'' अशी परिस्थिती निर्माण झाल्याची खंत व्यापारी आणि नागरिक व्यक्त करतात. शहरात नव्या व्यावसायिक संधी निर्माण झाल्या, तर बाजारपेठेला पुन्हा उभारी मिळू शकते.
----
विकासासाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक
कंधारचा विकास हा केवळ रस्ते आणि नाल्यांपुरता मर्यादित राहता कामा नये. राष्ट्रीय महामार्गाशी जोडणी, औद्योगिक वसाहत, रोजगारनिर्मिती, पर्यटन विकास, आधुनिक बाजारपेठ, कृषिपूरक उद्योग आणि प्रलंबित नागरी सुविधांची पूर्तता या मुद्द्यांवर दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. आमदार, खासदार, नगराध्यक्ष आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कंधारच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.
----
ठोस कृतीची गरज
ऐतिहासिक वारसा असूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या कंधारला आता केवळ आश्वासनांची नव्हे, तर ठोस कृतीची गरज आहे. शहरातील तरुणांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागू नये, व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी पोषक वातावरण मिळावे आणि ऐतिहासिक वैभव पाहण्यासाठी पर्यटकांनी कंधारकडे वळावे, अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. अन्यथा राष्ट्रकूटांच्या राजधानीचा ऐतिहासिक लौकिक केवळ इतिहासाच्या पानांपुरताच मर्यादित राहण्याची भीती आहे. इतिहासाचा अभिमान बाळगणाऱ्या कंधारला आता विकासाचे वर्तमान आणि समृद्ध भविष्य देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी स्वीकारली पाहिजे.