फोटो- डॉ. भारत बास्टेवाड
---
कर्जवसुलीत सक्ती केल्यास थेट फौजदारी कारवाई
जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांचा इशारा; वित्तीय संस्थांनी आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे
--
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ३० : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व अन्य कर्जदारांना दिलेल्या कर्जाची वसुली करताना स्मॉल फायनान्स, मायक्रो फायनान्स व इतर खासगी वित्तीय संस्थांनी कोणत्याही प्रकारची सक्ती, धमकी किंवा बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करू नये. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी शुक्रवारी दिल्या. नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास पोलिस व जिल्हा प्रशासनामार्फत संबंधितांवर कायद्यानुसार कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
खासगी वित्तीय संस्थांच्या कर्जवसुलीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदार आणि वित्तीय संस्थांचे म्हणणे जाणून घेतले. त्यानंतर बोलताना डॉ. बास्टेवाड म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत शेतकरी व कर्जदार आर्थिक अडचणींचा सामना करत असताना वित्तीय संस्थांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी सौजन्याचे व संवेदनशीलतेचे वर्तन करावे. कर्जवसुलीसाठी मानसिक त्रास देणे, अपमानास्पद वर्तन करणे, धमकावणे, हिंसाचार करणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा वापर करणे, अशा बेकायदेशीर किंवा नियमबाह्य कृतीचा अवलंब अजिबात करू नका, जे कर्जदार एकरकमी परतफेड करण्यास इच्छुक असतील, त्यांचे अर्ज स्वीकारून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्येही यासंदर्भातील वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी वित्तीय संस्थांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. या बाबतीत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी आवश्यक समन्वय साधावा. स्मॉल फायनान्स, मायक्रो फायनान्स व इतर वित्तीय संस्थांकडून कर्जवसुलीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधितांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डॉ. बास्टेवाड यांनी दिला.
क्षेत्रीय स्तरावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी स्मॉल फायनान्स, मायक्रो फायनान्स व इतर वित्तीय संस्थांच्या कर्जवसुलीच्या व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवावे. अनधिकृत वसुली, कर्जदारांना धमकावणे आणि इतर संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्यांची तातडीने पडताळणी करून संबंधित कायद्यांनुसार आवश्यक ती कारवाई करावी. तसेच अशा प्रकरणांचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
---