‘कर्जमुक्ती’साठी चौथ्या यादीत
तेरा हजार ७०० शेतकरी पात्र
आतापर्यंत एकूण ८२ हजार ५१ पात्र शेतकऱ्यांची नावे जाहीर
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १३ ः कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत जिल्ह्यातील १३ हजार ७०० थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश असून, आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ८२ हजार ५१ पात्र शेतकऱ्यांची नावे जाहीर झाली आहेत.
३० सप्टेंबर २०१५ ला थकीत व १ एप्रिल २०११ नंतर कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदत पीककर्ज माफीचा लाभ मिळणार आहे. पारदर्शकतेसाठी महा-आयटीमार्फत संगणकीय पोर्टल विकसित करण्यात आले असून, गावनिहाय याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय आणि चावडीवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या ४९ हजार ७९४ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ४५७ कोटी १८ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे. विशेष म्हणजे, या कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेत कोणतीही रक्कम भरण्याची गरज नाही, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
........
महत्त्वाचे आवाहन व पुढील प्रक्रिया
- प्रमाणीकरण बंधनकारक : यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त जाऊन आधार प्रमाणीकरण व ॲग्रिस्टॅक क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे. प्रमाणीकरणानंतरच प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.
- चौथ्या यादीतील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
- सध्याच्या यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांनी घाबरून न जाता बँक शाखेशी संपर्क साधावा, कारण पुढील टप्प्यात आणखी याद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.