पान ४ अँकर
----
कोट्यवधींची ओपन स्पेस अखेर नगरपंचायतीच्या ताब्यात
केजमध्ये भूमाफियांचा डाव उधळला; राखीव जागेवर पाडलेले १० प्लॉट जप्त
केज, ता. १२ (बातमीदार): ‘सकाळ’ने उजेडात आणलेल्या भूखंड घोटाळ्याची गंभीर दखल घेत केज नगरपंचायत प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिरासमोरील कोट्यवधी रुपयांची मोकळी जागा (ओपन स्पेस) बळकावून त्यावर बेकायदेशीरपणे १० प्लॉट पाडणाऱ्या भूमाफियांचा डाव उधळून लावण्यात आला आहे. ‘सकाळ’च्या दणक्यानंतर प्रशासनाने तत्काळ या जागेची मोजणी करून, तब्बल १७६४ चौरस मीटरची ही बहुमूल्य जागा पुन्हा नगरपंचायतीच्या नावे वर्ग केली आहे.
केज शहरातील प्रसाद गृहनिर्माण संस्थेतील गट क्रमांक १८/२ मध्ये ही मोकळी जागा आहे. नियमानुसार, स्थानिक रहिवाशांच्या सोयी-सुविधांसाठी आणि सार्वजनिक वापरासाठी ही जागा कायदेशीररीत्या राखीव (ओपन स्पेस) ठेवण्यात आली होती. मात्र, या नियमांना हरताळ फासत काही भूमाफियांनी या जागेवर परस्पर १० प्लॉट पाडले आणि त्यांची बेकायदेशीर विक्री केली. एवढ्यावरच न थांबता, भूमाफियांनी आणखी ३ प्लॉट पाडून ते विकण्याचीही तयारी सुरू केली होती. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर, प्रकाश मुंडे यांनी पुराव्यांसह नगरपंचायतीकडे रीतसर तक्रार दाखल केली होती.
या गंभीर प्रकरणावर ‘सकाळ’ने सविस्तर आणि ठळक वृत्त प्रसिद्ध करून हा घोटाळा चव्हाट्यावर आणला. या वृत्ताची दखल घेत केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा डॉ. सीता बनसोड, गटनेते हारून इनामदार आणि मुख्याधिकारी अजित ढोपे यांनी तातडीने पावले उचलली. गटनेते हारून इनामदार यांच्या उपस्थितीत प्रशासकीय पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन या जागेची अधिकृत मोजणी केली.
----
मोजणीनंतर अतिक्रमण आले समोर
मोजणीअंती या राखीव जागेवरील भूमाफियांचे अतिक्रमण सिद्ध झाले. त्यानंतर कोणतीही गय न करता प्रशासनाने ही कोट्यवधी रुपयांची जागा पुन्हा नगरपंचायतीच्या ताब्यात घेतली आणि अधिकृत दप्तरी तिची नोंद केली. ''सकाळ''च्या पुराव्यानिशी केलेल्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक हिताची हक्काची जागा सुरक्षित राहिल्याने, स्थानिक नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.