केसरजवळग्यात १२ दिवसांपासून पथदिवे बंद
केसरजवळगा, ता. २० : येथील तलाठी कार्यालयाजवळील ट्रान्सफॉर्मर परिसरातील पथदिवे गेल्या १२ दिवसांपासून बंद असल्याने वॉर्ड क्रमांक १ व २ मधील नागरिकांना अंधारात वावरावे लागत आहे. एअरबंच केबल जळाल्याने ही समस्या निर्माण झाली असून, महावितरणच्या देखभाल कंपनीकडे आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याने दुरुस्तीचे काम रखडल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिकांतून संताप व्यक्त होत असून, तत्काळ पर्यायी व्यवस्था करून पथदिवे सुरू करण्याची मागणी होत आहे.
केबल जळाल्याने सुमारे २०० घरांचा वीजपुरवठा १८ तास खंडित झाला होता. त्यानंतर तातडीने जॉइंट देऊन घरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र, पथदिव्यांचा प्रश्न अद्याप कायम आहे. रात्रीच्या वेळी महावितरणचे कर्मचारी मुख्यालयी उपलब्ध नसणे आणि तात्पुरत्या उपाययोजनेऐवजी कायमस्वरूपी दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
महावितरणच्या देखभाल कंपनीकडे खांब व केबल उपलब्ध नसल्याने दुरुस्तीचे काम रखडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ग्रामविकास अधिकारी गंगाधर इंगळे म्हणाले, १७ तारखेलाच कर्मचाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मिळाले होते. मात्र, अद्याप परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे सोमवारी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने काम पूर्ण करण्याबाबत लेखी पत्र देण्यात येणार आहे.’
सामाजिक कार्यकर्ते अजीज शेख म्हणाले, ‘गेल्या १२ दिवसांपासून नागरिकांना केवळ आज-उद्याची आश्वासने दिली जात आहेत. अंधारामुळे रात्री घराबाहेर पडणे धोकादायक बनले आहे. चोरीच्या घटना तसेच साप-विंचूचा धोका वाढला आहे. महावितरणने टाळाटाळ न करता तत्काळ मार्ग काढावा.’
-----
दोन दिवसांत आवश्यक साहित्य उपलब्ध होईल. त्यानंतर तत्काळ दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल.
- गणेश शेंबाळे, शाखा अभियंता