हातात आलेली पिके करपली
पावसाच्या दडीमुळे केसरजवळगाचे शेतकरी संकटात
केसरजवळगा, ता. २१ (बातमीदार) : केसरजवळगा परिसरासह आलूर, वरणाळ, बेळंब व कोथळी परिसरात पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांची मोठी वाताहत झाली आहे. जून-जुलै महिन्यातील सुरवातीच्या पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग व उडदाची पेरणी केली होती. मात्र, पीक वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यातच पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील उभी पिके डोळ्यांसमोर करपून गेली आहेत.
बियाणे, खते, मशागत व फवारणीवर हजारो रुपयांचा खर्च करूनही हातात काहीच पडणार नसल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. पीक काढणीचा खर्चही निघणे कठीण झाल्याने ''खर्च जास्त आणि उत्पन्न शून्य'' अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. परतीचा पाऊस न झाल्यास खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची आणि आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
......
((कोट))
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पावसाने ताण दिल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. शासनाने उशीर न करता तातडीने दुष्काळसदृश मदत जाहीर करावी.
- अभिजित घाळे, शेतकरी
.....
(कोट))
उमरगा तालुक्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मुरूम महसूल मंडळातील कोरड्या दुष्काळाची दाहकता वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिली असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
- लोकेश बिराजदार, तालुका सरचिटणीस, भाजप
.......
(कोट))
पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने हेक्टरी किमान ७० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी.
- बलभीम पटवारी, माजी सरपंच
.......
केसरजवळगा ः पावसाने दडी मारल्यामुळे उभे सोयाबीन पीक शेंगाविना जमिनीवरच करपून गेले आहे.
.....
फोटो क्रमांक ः OSM26B07045