केशलोचन म्हणजे आत्मशुद्धी आणि संयमाचा मार्ग
आर्यनंदी कॉलनीत आचार्य हेमसागर महाराजांचा केशलोचन विधी
छत्रपती संभाजीनगर : आर्यनंदी कॉलनी, वेदांतनगर येथे चातुर्मासासाठी विराजमान असलेले आचार्य १०८ हेमसागरजी गुरुदेव यांचा शुक्रवारी (ता. ३०) सकाळी केशलोचन विधी भक्तिमय वातावरणात झाला. यावेळी भगवान जिनेंद्रांचा पंचामृत अभिषेक केला. जैन श्रावक-श्राविकांनी उपस्थित राहून धर्मलाभ घेतला.
जैन धर्मात केशलोचन या विधीला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. साधुसंत स्वतःच्या हातांनी डोक्यावरील केस काढतात. हा विधी केवळ बाह्य त्याग नसून देहाविषयीची आसक्ती, सुखसुविधांची अपेक्षा आणि मोह यांचा त्याग करण्याचे प्रतीक मानला जातो. केशलोचनाच्या वेळी होणाऱ्या शारीरिक वेदना समभावाने सहन करून साधक सहनशीलता, धैर्य आणि आत्मसंयमाचा आदर्श समाजासमोर ठेवतात.
प्रवचनातून संयम आणि आत्मकल्याणाचा संदेश
आचार्यश्रींच्या चातुर्मासाच्या निमित्ताने धर्म, त्याग, तपश्चर्या आणि आत्मकल्याणाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. जैन तत्त्वज्ञानानुसार, शरीर नश्वर असून आत्मा शाश्वत आहे. त्यामुळे मनुष्याने बाह्य सौंदर्यापेक्षा अंतःकरणाची शुद्धता, राग-द्वेषाचा त्याग आणि सम्यक आचरण यांना अधिक महत्त्व द्यावे. तपश्चर्या ही केवळ शारीरिक कष्टांची प्रक्रिया नसून मनातील विकारांवर विजय मिळविण्याचा मार्ग आहे.