LTR26B15616
लातूर : श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात १९९५ च्या बॅचमधील माजी विद्यार्थी.
--
तब्बल ३१ वर्षांनंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा
-------------
केशवराज विद्यालयात १९९५ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
--
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १३ : श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात १९९५ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण, भावस्पर्शी आणि अविस्मरणीय वातावरणात झाला. तब्बल ३१ वर्षांनंतर पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या प्रांगणात एकत्र येत या माजी विद्यार्थ्यांनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ असा संपूर्ण दिवस बालपणीच्या आठवणींना उजाळा देत शालेय जीवनाचा आनंद पुन्हा अनुभवला.
स्नेहमेळाव्याची सुरवात शाळेच्या परिचित घंटानादाने झाली. आयुष्यातील अनेक वर्षे पुढे सरकली, काळ बदलला, प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात स्थिरावला. मात्र, शाळेची घंटा ऐकताच सर्वांच्या मनात पुन्हा विद्यार्थीदशेतील आठवणी जाग्या झाल्या. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात सामूहिक प्रार्थना आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली झाली. त्यानंतर जुन्या मित्रमैत्रिणींच्या गप्पा सुरू झाल्या. एकमेकांची विचारपूस, जुन्या आठवणी, खोड्या, शिक्षकांचे किस्से आणि शालेय जीवनातील गमतीजमती या चर्चेमुळे संपूर्ण वातावरण आनंदाने भारावून गेले. यावेळी गुरुजनांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आदर, आपुलकी आणि समाधानाचे भाव स्पष्टपणे दिसत होते.
विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक शैलेंद्र कंगळे आणि उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. १९९४-९५ मधील उपमुख्याध्यापक रत्नाकरराव कंगळे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यानंतर विविध मनोरंजक उपक्रम, खेळ आणि गप्पागोष्टींनी कार्यक्रमात आणखी रंग भरला. बालपणीच्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी या दिवसाचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी शिक्षक बबन गायकवाड, संतोष बीडकर, लक्ष्मीकांत बुगदे, गुरुनाथ झुंजारे, नीलेश तावशीकर, त्रिंबक कुलकर्णी, संदीप साबणे, प्रसाद गिरवलकर आदी उपस्थित होते.