खंडोबा मंदिराच्या ‘ब’ दर्जासाठी महापालिकेचा प्रस्ताव
---
सातारा परिसर, ता. १४ : येथील ऐतिहासिक खंडोबा मंदिर तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा मिळावा, यासाठी महापालिकेतर्फे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. शासनाकडून मंदिराला ‘ब’ दर्जा मिळाल्यास अनुदानात वाढ होणार असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना परिसरात सोयी-सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सातारा परिसरातील श्री खंडोबा मंदिराला शासनाकडून यापूर्वी ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. त्यानुसार पर्यटन विभागाने मंदिराचे नूतनीकरण सुरू केले. दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खंडोबा मंदिर तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा मिळावा, म्हणून शासनाकडे मागणी केली. त्यानुसार महापालिकेकडून प्रस्ताव दाखल होणे आवश्यक असल्याचे शासनाच्या अवर सचिवांनी जिल्हा प्रशासनाला कळविले आहे. त्यानुसार १८ सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाने हा प्रस्ताव सादर केला.
खंडोबा मंदिरात दर्शनासाठी वर्षाकाठी १० ते १५ लाख भाविक येतात. चंपाषष्ठीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते आणि नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे राज्य शासनातर्फे खंडोबा मंदिर तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा मिळावा, यासाठी प्रशासनातर्फे सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा मिळाल्यास परिसरातील विकासकामांसाठी वर्षाला पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.