((ABD26J78398))
सिडको ः ‘खर्ची पडलीत काही स्वप्नं’ कवितासंग्रहाचे प्रकाशन करतान डॉ. सुदाम राठोड, डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. सविता लोंढे, डॉ. दादा गोरे.
---
स्त्रियांच्या अनुभवविश्वाच्या ५४ खिडक्या म्हणजे
‘खर्ची पडलीत काही स्वप्नं ः डॉ. सुदाम राठोड
---
सिडको, ता. ३१ ः प्राचीन काळापासून कवितेचे स्वरूप बदलत गेले असून, कवितेवरील अनेक बंधने आता दूर झाली आहेत. संत तुकारामांच्या अभंगांपासून ते नामदेव ढसाळ यांच्या कवितांपर्यंत याची सुंदर उदाहरणे आहेत. प्रत्येक कवितासंग्रहातील प्रत्येक कविता मनावर ठसतेच असे नाही. मात्र, काही ओळी अशा असतात, ज्या कायमच्या मनावर कोरल्या जातात. कवयित्री डॉ. सविता लोंढे यांचा ‘खर्ची पडलीत काही स्वप्नं’ हा कवितासंग्रह स्त्रियांच्या अनुभवविश्वाच्या ५४ खिडक्या उघडणारा आहे, असे प्रतिपादन कादंबरीकार डॉ. सुदाम राठोड यांनी केले.
एन-३, सिडको येथील शिवछत्रपती महाविद्यालयात सोमवारी (ता. ३१)प्रगतिशील लेखक संघ, शताब्दी काव्य मंडळ, आम्ही सिद्ध लेखिका आणि ध्यास गझल समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री डॉ. सविता लोंढे यांच्या ‘खर्ची पडलीत काही स्वप्नं’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी डॉ. सविता लोंढे यांची कविता सहज मनाला भिडणारी असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. दादा गोरे होते. विचारवंत डॉ. ऋषिकेश कांबळे, प्राचार्य डॉ.सी.एस. पाटील यांची उपस्थिती होती. आशा डांगे यांनी कवितांचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन अविनाश सोनटक्के यांनी केले.