खरीप पिकांच्या ६५ टक्के
पीककापणी प्रयोगांची पूर्तता
पीकविमा, उत्पादकतेच्या अचूक नोंदीसाठी ठरणार आधार
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता.२१ ः नैसर्गिक आपत्ती आणि पावसाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचे अचूक मूल्यांकन करून शेतकऱ्यांना पीकविम्याचे योग्य कवच मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६-२७ अंतर्गत पीककापणी प्रयोगांची मोहीम वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात नियोजित एक हजार ४०९ प्रयोगांपैकी गुरुवारपर्यंत (ता. १५) ९१९ म्हणजेच ६५.२ टक्के प्रयोग यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, उर्वरित प्रयोगांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
प्रत्यक्ष उत्पादनाची शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी पीककापणी प्रयोगांद्वारे मिळणाऱ्या आकडेवारीच्या आधारेच पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत उंबरठा उत्पादन आणि प्रत्यक्ष उत्पादन यांची तुलना करून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई निश्चित केली जाते. पीककापणी प्रयोग ही केवळ प्रशासकीय बाब नसून शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि प्रत्यक्ष उत्पादनाचे योग्य मूल्यमापन करणारी प्रणाली आहे. निवडलेल्या शेतातील ठरावीक क्षेत्रातील पिकाची कापणी करून प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित केली जाते. या माहितीचा उपयोग केवळ पीकविम्यासाठीच नव्हे, तर जिल्ह्याचे कृषी उत्पादनाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी, भविष्यातील कृषी नियोजनासाठी आणि शासनाला वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून देण्यासाठी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
......................
((पॉईंटर))
पीकनिहाय कापणी प्रयोगांची सद्यःस्थिती
कृषी व महसूल प्रशासनामार्फत जिल्ह्यात बाजरी, मका, तूर, सोयाबीन, उडीद, मूग, कापूस आणि खरीप कांदा अशा आठ प्रमुख पिकांसाठी कापणी प्रयोगांचे नियोजन करण्यात आले आहे.
- बाजरी : नियोजित २ पैकी २ प्रयोग पूर्ण.
- सोयाबीन : ५०३ पैकी ३८७ प्रयोग पूर्ण.
- उडीद: ३१२ पैकी २८८ प्रयोग पूर्ण.
- मूग: २४८ पैकी २३७ प्रयोग पूर्ण.
- मका: २८ पैकी ५ प्रयोग पूर्ण.
...............
((चौकट))
तूर, कापूस व खरीप कांदा
तुरीचे २२४, कापसाचे २ व कांद्याचे ९० पीककापणी प्रयोग होणार असून, या पिकांची काढणी आगामी काळात होणार असल्याने या प्रयोगांची प्रक्रिया सुरू आहे.