खरीप पिकांच्या नुकसानीची
जिल्हा प्रशासनाकडून पाहणी
-----
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ९ : पावसातील मोठ्या खंडामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना ठोस शासकीय मदत मिळवून देण्यासाठी महसूल, कृषी आणि तज्ज्ञांच्या संयुक्त पथकांकडून प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन शास्त्रीय व वस्तुनिष्ठ पाहणीस सुरवात झाली आहे.
पाहणीदरम्यान शास्त्रज्ञ, कृषी विभागातील तज्ज्ञ आणि महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून पावसाच्या खंडाचा पिकांवर झालेला परिणाम, जमिनीतील ओलावा, पिकांची सद्यःस्थिती आणि संभाव्य उत्पादनातील घट यांचा सविस्तर आढावा घेतला. पाहणीत नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमांनुसार मदतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
------
सप्टेंबरमध्येच पीक कापणी
प्रयोग घेण्याची मागणी
अनेक शेतकऱ्यांनी सुकलेली पिके शेतात न ठेवता काढणीस सुरवात केली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार पीक कापणी प्रयोग ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित आहेत. मात्र, तोपर्यंत शेतात पीकच उपलब्ध न राहिल्यास उत्पादनातील घट निश्चित करण्यात अडचणी येऊन शेतकरी भरपाईपासून वंचित राहू शकतात. ही बाब लक्षात घेऊन पीक कापणी प्रयोग नियोजित कालावधीपूर्वीच म्हणजेच सप्टेंबर महिन्यातच पार पाडावेत, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषी आयुक्तांकडे केली आहे. वाशी तालुक्यातील तेरखेडा आणि तुळजापूर तालुक्यातील इटकळ परिसरात पाटील यांनी पाहणी केली. येत्या आठवडाभरात संपूर्ण जिल्हास्तरीय अहवाल शासनाकडे सादर केला जाईल, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
--------
प्रत्येक मंडळात पीक
कापणी प्रयोगाचे १२ प्लॉट
जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात प्रत्येक पिकासाठी पीक कापणी प्रयोगाचे १२ प्लॉट निश्चित करण्यात आले आहेत. या निश्चित प्लॉटची माहिती संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानग्रस्त पिकांची कापणी करण्यापूर्वी कृषी विभागाशी संपर्क साधून आपल्या गावातील निश्चित प्लॉटची माहिती आवर्जून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
.......
धाराशिव ः सुकलेल्या पिकांची पाहणी करताना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह आमदार राणाजगजितसिंह पाटील.
फोटो क्रमांक ः OSM26B06922