ABD26J78833
गंगापूर जहागीर ः कृष्णपूरवाडी येथे निघालेल्या पायी पालखी सोहळ्यात सहभागी भाविक.
गोकुळाष्टमीनिमित्त खाटूश्याम बाबांचा पालखी सोहळा
गंगापूर जहागीर, ता. ७ (बातमीदार) : गोकुळाष्टमीनिमित्त श्री श्याम बाबा सेवा समिती, अक्षद सुपर सिटी, गंगापूर जहागीर यांच्यातर्फे शुक्रवारी (ता. चार) खाटूश्याम बाबांचा पायी पालखी सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.
महाराष्ट्रात प्रथमच खाटूश्याम बाबांची पायी पालखी कृष्णपूरवाडी येथे नेण्यात आली. सोहळ्यास छत्रपती संभाजीनगर शहर सुधार समितीचे सभापती तथा प्रभाग क्र. ८ चे नगरसेवक रामदास हरणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच खाटूश्याम बाबा मंदिर, कृष्णपूरवाडीचे ट्रस्टी किरण दौंड पाटील, सरपंच नामदेव भावले उपसरपंच विजय गायके, राजमाता इंग्लिश स्कूलचे संस्थापक संदीप दहीहंडे, यशोदीप वानखेडे, सुरेश गव्हाणे, किरण मिसाळ, गजानन वीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. फुलांनी सजविलेल्या पालखीसमोर भाविकांनी ‘जय श्री श्याम’चा जयघोष करत सहभाग नोंदविला. भजन, कीर्तन व भक्तिगीतांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. पालखी मार्गावर ठिकठिकाणी भाविकांकडून पुष्पवृष्टी व उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात परिसरातील महिला, पुरुष, युवक व नागरिकांनी सहभाग घेतला. आयोजक मारोती लोणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री श्याम बाबा सेवा समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष पुढाकार घेतला.