ABD26J82657
किनवटमध्ये प्रवाशांची पळवापळवी!
----
बस आगाराच्या दारात अवैध प्रवासी वाहतुकीचा सुळसुळाट
----
शुभम शिंदे
गोकुंदा, ता.३ : एसटी महामंडळाचा तोटा कमी करून प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एकीकडे विविध योजना राबविल्या जात आहेत. महिलांना अर्धे तिकीट, ज्येष्ठ नागरिकांना सवलत आणि सुरक्षित प्रवासाच्या सुविधा देऊन प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, किनवट आगाराच्या प्रवेशद्वारावरच अवैध प्रवासी वाहतुकीचा खुलेआम व्यवसाय सुरू असल्याने एसटी महामंडळाच्या प्रयत्नांना आगारातूनच खीळ बसत आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार आगार परिसरात सुरू असताना त्यावर प्रभावी नियंत्रण का मिळवता येत नाही, असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे.
किनवट आगाराबाहेर खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांना आवाज देऊन वाहनांमध्ये बसविले जाते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनांमध्ये कोंबून वाहतूक केली जाते. एसटी बस सुटण्यापूर्वीच खासगी वाहने प्रवासी घेऊन मार्गस्थ होत असल्याने एसटीच्या उत्पन्नाला थेट फटका बसत आहे. एसटीच्या प्रवाशांवर डोळा ठेवून आगाराच्या प्रवेशद्वारावरच खासगी वाहतूकदारांनी आपले जाळे निर्माण केलेले असतानाही आगारप्रमुख बघ्याची भूमिका घेत आहेत. आगारप्रमुखांना याबाबत विचारणा केली असता, अवैध वाहतुकीविरोधात नियमित तक्रारी दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या तक्रारींच्या प्रती मागितल्यानंतर तीन दिवस उलटूनही त्या उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याचा आरोप आहे. नियमित तक्रारी केल्या जात असतील, तर त्यांचे पुरावे देण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणातील तक्रारींची सत्यता आणि त्यावर झालेली कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासण्याची गरज आहे.
----
एसटी बस निर्धारित वेळेत सुटेना
दुसरीकडे एसटीच्या गाड्या निर्धारित वेळेत सुटत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. एसटी वेळेवर उपलब्ध नसताना खासगी वाहनचालक मात्र प्रवासी घेण्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे प्रवासी खासगी वाहनांकडे वळत असतील, तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
------
(((कोट))
तक्रारीची प्रत आम्ही तुम्हाला का द्यावी? आजपर्यंत आम्ही ती कधीही कुणाला दिली नाही.
-अशोक चव्हाण, आगार प्रमुख, किनवट.
---
(((कोट))
तक्रारीची प्रत मी तुम्हाला देऊ शकत नाही. ती तुम्हाला आगारप्रमुखांकडे किंवा पोलिस ठाण्यात मिळेल.
-शिलरत्न ढगे, स्थानक प्रमुख, किनवट आगार.