कोल्हारवाडीत आज रेड्यांच्या टकरींचा थरार
बीड, ता. ९ : शहराजवळील कोल्हारवाडी येथे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पारंपरिक रेड्यांच्या टकरींचे आयोजन करण्यात आले आहे. ५० वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा पाहण्यासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यांतून हजारो शौकीन उपस्थित असतात. कोल्हारवाडी येथे दरवर्षी बलिप्रतिपदेला टकरींचे आयोजन केले जाते. परिसरातील नागरिक, शेतकरी आणि तरुण कार्यक्रमाला उपस्थित राहतात. यंदाही स्थानिक पशुपालकांसह धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा तसेच मराठवाड्यातील विविध भागांतून शेतकरी रेडे आणि म्हशी घेऊन येणार आहेत.
सकाळी गावातील ग्रामदैवत शिवगिरी बाबा मंदिरासमोर म्हशी आणि रेड्यांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात येणार आहे. यावेळी पशुपालकांचा गावकऱ्यांच्या वतीने मानाचा फेटा बांधून आणि पानसुपारी देऊन सत्कार होईल. त्यानंतर सजविलेल्या म्हशी आणि रेड्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता म्हशींच्या पळण्याच्या स्पर्धेला सुरवात होईल.
-----
दुपारनंतर मैदानावर आयोजन
दुपारी दोननंतर गावातील पाझर तलावाजवळील खुल्या मैदानावर टकरींना सुरवात होणार आहे. सायंकाळी साडेसहापर्यंत कार्यक्रम सुरू राहणार असून, विजयी रेड्याची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर शिवगिरी बाबा मंदिरासमोर बक्षीस वितरण आणि पशुपालकांचा गौरव करण्यात येणार आहे.
-----
गेल्या ५० वर्षांपासून रेड्यांच्या टकरींची परंपरा सुरू आहे. या एका दिवसाच्या आयोजनासाठी शेतकरी वर्षभरापासून रेड्यांची तयारी करतात. परिसरातील २० ते २५ गावांसह परजिल्ह्यांतूनही शेतकरी उत्साहाने सहभागी होतात. हा शेतकऱ्यांचा सण आणि परंपरेचा उत्सव आहे.
-गोरख सिंघण, ग्रामस्थ