जिल्ह्यात १९ हजार ९६१
कुणबी प्रमाणपत्रे वितरित
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ६ ः कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी २४ ऑक्टोबर २०२३ पासून आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे एकूण २० हजार १० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी तब्बल १९ हजार ९६१ अर्ज मंजूर करून संबंधितांना जात प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. तर ३९ अर्ज त्रुटीत अडकली आहेत.
शासनातर्फे जुन्या नोंदी शोधण्याची मोहीम राबविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी प्रमाणपत्रांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. प्रशासनाने प्राप्त अर्जांवर वेगाने कार्यवाही करत बहुतांश अर्जांचा निपटारा केला आहे. दरम्यान, हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा-कुणबी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया तुलनेने किचकट असल्याचे चित्र आहे. संबंधित जुन्या नोंदी शोधणे, त्याआधारे वंशावळ तयार करणे, ती गावस्तरीय समितीसमोर सादर करणे, समितीकडून चौकशी करून अहवाल घेणे, त्यानंतर ‘आपले सरकार’ पोर्टलवरून अर्ज दाखल करणे, अशा विविध टप्प्यांतून अर्जदारांना जावे लागते. त्यामुळे या प्रकारचे अर्ज करण्यास नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. हैदराबाद गॅझेटच्या आधारे प्राप्त झालेले १० अर्ज सध्या प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. तसेच ज्यांच्या कागदपत्रांमध्ये कुणबीची थेट नोंद आढळते, त्यांनाही प्रमाणपत्राच्या पुढील पडताळणी प्रक्रियेत काही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर येत आहे. काही प्रकरणांत पडताळणीदरम्यान प्रमाणपत्रे बाद होत असल्याने नागरिकांमध्येही प्रमाणपत्र काढण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
---
कायमस्वरूपी तोडग्याची मागणी
कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी प्रमाणपत्रांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळत नसल्याचा, काही प्रमाणपत्रे पडताळणीमध्ये बाद होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सकल मराठा समाजाकडून कायमस्वरूपी तोडग्याची मागणी करण्यात येत आहे.
................