कुपटी ग्रामपंचायतीत १०.८३ लाखांच्या कथित अपहाराचा आरोप

कुपटी ग्रामपंचायतीत १०.८३ लाखांच्या कथित अपहाराचा आरोप
Published on: 
कुपटी ग्रामपंचायतीत १०.८३ लाखांचा अपहार ---- गुन्हा नोंदविण्याबाबत पंचायत समिती आणि पोलिसांत समन्वयाचा अभाव? ----- गोकुंदा,ता. १५ (बातमीदार) : किनवटच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील १७ कोटींच्या अपहाराचे प्रकरण चर्चेत असतानाच कुपटी (खु.) ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा कोष समितीच्या खात्यातून १० लाख ८३ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सात धनादेशांवरील स्वाक्षऱ्या बनावट करून शासकीय निधी वळविल्याचा दावा तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी दीपक वानोळे यांनी केला. या प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी गुन्हा नोंदविण्याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कुपटी (खु.) येथील ग्रामसभा कोष समितीचे खाते किनवट येथील भारतीय स्टेट बँकेत आहे. या खात्यातील व्यवहार समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि ग्रामपंचायत सचिव यांच्या संयुक्त स्वाक्षऱ्यांनी केले जातात. मात्र, खात्याचे विवरणपत्र आणि धनादेशांच्या प्रती तपासल्यानंतर सात धनादेशांद्वारे १० लाख ८३ हजार रुपये विविध व्यक्ती आणि एजन्सींच्या खात्यांत अनधिकृतपणे वर्ग केल्याचा दावा तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी वानोळे यांनी केला. संबंधित धनादेशांवरील सचिवांच्या स्वाक्षऱ्या बनावट असून, आपण त्यावर स्वाक्षरी केलेली नाही, असे त्यांनी लेखी तक्रारीत नमूद केले आहे. तसेच पदभार स्वीकारताना संबंधित धनादेश पुस्तिका मिळाली नसल्याचाही दावा वानोळे यांनी केला. त्यामुळे धनादेशांवरील स्वाक्षऱ्यांची पडताळणी कशी झाली, खात्यातून रक्कम कशी वळती झाली आणि व्यवहारांचा लाभ कोणाला झाला, याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. याबाबत बँकेची अधिकृत भूमिका आणि व्यवहारांच्या पडताळणीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. ----------- बीडीओचे पत्र या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांनी इस्लापूर पोलिस ठाण्याला गुन्हा नोंदविण्याबाबत पत्र दिल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, १० ऑक्टोबर रोजी प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना कार्यवाही करण्यास सांगण्यात आले. मात्र, इस्लापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ---- पोलिस म्हणतात, आधी चौकशी करू किनवट पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंडलवार यांच्याशी संपर्क साधला असता आधी चौकशी पूर्ण करू, त्यानंतर गुन्हा नोंदविण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आल्याचे वाघमारे यांनी नमूद केले. उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम हे रजेवर असल्याचे कळल्याने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे (एसडीएम) दाद मागण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. --- ‘उठसूट पत्रच देत राहू का?’ पंधरा ऑक्टोबरला गटविकास अधिकारी वाघमारे यांनी कुपटी गावाला भेट देऊन चौकशी केली. यावेळी तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी वानोळे यांच्याकडून लेखी माहिती घेतली. ग्रामसभा कोष समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांनीही कथित अपहाराशी संबंधित धनादेशांवरील स्वाक्षऱ्या आपल्या नसल्याचे निवेदन दिल्याचे वाघमारे यांनी सांगितले. इस्लापूर पोलिसांना पत्र दिले होते; मात्र, त्यांनी गुन्हा नोंदविला नसल्याचे वाघमारे यांनी सांगितले. किनवट येथील स्टेट बँकेत व्यवहार झाल्याने किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याबाबतही चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर किनवट पोलिसांकडे स्वतंत्र पत्र दिले का आणि त्यानंतर काय पाठपुरावा केला, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता, ‘मी उठसूट पत्रच देत राहू का?’ असे उत्तर वाघमारे यांनी दिले. यामुळे प्रशासकीय उत्तरदायित्व आणि तक्रारीच्या पाठपुराव्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. -------------- बँकेच्या नोंदींची तपासणी करावी तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी वानोळे यांनी स्वाक्षऱ्या बनावट असल्याचा दावा केला असला, तरी या आरोपांची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे. संबंधित खात्याचे व्यवहार, धनादेश पुस्तिकेचा ताबा, पदभार हस्तांतरणाच्या नोंदी, बँकेकडील स्वाक्षरी नमुने आणि व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. ----- इस्लापूर पोलिसांची भूमिका काय? इस्लापूरचे पोलिस निरीक्षक जाधवर यांनी संबंधित व्यवहार किनवट येथील स्टेट बँकेत झाल्याने या प्रकरणाची तक्रार आणि तपास किनवट पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात होऊ शकतो, अशी भूमिका मांडल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कथित अपहाराची चौकशी कोण करणार, अधिकृत तक्रारीवर काय निर्णय झाला, बँकेचे सीसीटीव्ही फुटेज आणि पे-इन स्लिप्स तपासण्यात आल्या का, तसेच १० लाख ८३ हजारांच्या व्यवहारांचा लाभ नेमका कोणाला झाला, याबाबत स्पष्टता येणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com