गुंठेवारीसाठी ११ दिवसच शिल्लक; आता मुदतवाढ नाही!
--
आतापर्यंत ८५ कोटींचे उत्पन्न; ३१ ऑक्टोबरला गुंठेवारी कक्ष बंद होणार?
--
छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या गुंठेवारी मोहिमेची मुदत आता संपत आली आहे. नियमितीकरणासाठी अवघे ११ दिवस शिल्लक असून, ३१ ऑक्टोबरनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे महापौर समीर राजूरकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे गुंठेवारी नियमितीकरणासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे.
महापौरांनी अंतिम इशारा देताच महापालिकेच्या गुंठेवारी कक्षात गर्दी वाढली आहे. या मोहिमेतून आतापर्यंत महापालिकेला ८५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तथापि, राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची बांधकामे गुंठेवारीअंतर्गत नियमित करण्यासाठी सवलत दिल्यानंतर महापालिकेने जून २०२२ पासून ही मोहीम सुरू केली. मध्यंतरी सवलती बंद झाल्याने मोहिमेला प्रतिसाद कमी झाला होता. मात्र, यंदा पुन्हा सवलती लागू केल्याने गुंठेवारीला गती मिळाली आहे. १ एप्रिल ते ६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ६ हजार ३०६ संचिकांना मंजुरी दिली गेली. त्यातून ६७ कोटी ५९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतरही अर्जांचा ओघ सुरूच असून, सध्या दररोज सुमारे ३०० ते ४०० संचिका दाखल होत आहेत. त्यामुळे एकूण उत्पन्न ८५ कोटी रुपयांपर्यंत पोचल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
---
कागदपत्रांच्या त्रुटींमुळे नागरिकांची धावपळ
गुंठेवारीसाठी नागरिकांची गर्दी वाढत असली, तरी अर्जांसोबत आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्याने अनेकांना त्रुटी दूर करण्यासाठी पुन्हा धावपळ करावी लागत आहे. वाढती गर्दी आणि संचिकांचा निपटारा करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे. महापालिकेने नगररचना विभागात स्वतंत्र कक्ष सुरू केला असून, प्रभागांमध्ये शिबिरेही घेतली जात आहेत. आयुक्तही मोहिमेचा दैनंदिन आढावा घेत आहेत.
---
मुदतवाढ नाही म्हणजे नाही : महापौर
‘महापालिकेने आतापर्यंत सर्व प्रकारच्या विशेष सवलती लागू करून गुंठेवारी मोहीम राबवली. नागरिकांचा मोठा प्रतिसादही मिळत आहे. तरीही ३१ ऑक्टोबर हीच अंतिम तारीख असेल. यापुढे गुंठेवारीला मुदतवाढ नाही म्हणजे नाही’, अशी ठाम भूमिका महापौर समीर राजूरकर यांनी घेतली आहे.