लातुरातील ऑटोरिक्षावर पोलिसांची नजर
-
वाहतूक नियंत्रण शाखेकडून होणार कसून तपासणी
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ६ ः लातूर शहरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ऑटोरिक्षांच्या नियमबद्धतेकडे वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष लक्ष देण्यात येत असून, ऑटोरिक्षांची कसून तपासणी करण्यात येणार आहे.
शहरातील प्रवासी वाहतुकीमध्ये ऑटोरिक्षांचा मोठा सहभाग आहे. नागरिकांना सुरक्षित, शिस्तबद्ध व नियमबद्ध सेवा मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रण शाखेकडून ऑटोरिक्षांची कागदपत्रे तसेच वाहन चालविताना करण्यात येणाऱ्या नियमांच्या पालनाची तपासणी केली जात आहे.
तपासणीदरम्यान विनापरवाना ऑटोरिक्षा चालविणे, वाहनावर प्रलंबित असलेला दंड न भरता वाहन चालविणे, ऑटोरिक्षा चालकाने निर्धारित युनिफॉर्मचा वापर न करणे आदी बाबी निदर्शनास आल्यास, त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच काही ऑटोरिक्षांमध्ये मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीमचा वापर करणे, वाहनांना विविध प्रकारच्या अनधिकृत किंवा भडक रंगाच्या लाइट लावून सजविणे आदी बाबीही आढळून येत आहेत. अशा प्रकारांवरही वाहतूक नियंत्रण शाखेचे विशेष लक्ष असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
ऑटोरिक्षा चालकांनी नागरिकांना वाजवी दरात, सुरक्षित आणि शिस्तबद्ध सेवा देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे सर्व ऑटो चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नियमांचे उल्लंघन करून ऑटोरिक्षा चालविताना आढळून येणाऱ्या चालकांविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे लातूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ऑटोरिक्षा चालकांना आवाहन
- वाहन चालविताना वैध ड्रायव्हिंग लायसन्स जवळ बाळगावे
- ऑटोरिक्षाचे वैध परमिट व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत
- वाहनावर प्रलंबित असलेला दंड असल्यास तो भरून घ्यावा
-ऑटोरिक्षा चालविताना निर्धारित युनिफॉर्मचा वापर करावा
- ऑटोरिक्षामध्ये मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टीम वापरू नये.
- वाहनाला अनधिकृत किंवा नियमबाह्य रंगीबेरंगी लाइट लावू नयेत
- वाहतूक नियमांचे पालन करून नागरिकांना शिस्तबद्ध व सुरक्षित प्रवासी सेवा द्यावी
-----