उसाच्या शेतामध्ये गांजाची झाडे
२३ लाखांवर मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा
---
लातूर, ता. २० : लातूर जिल्ह्यात अमली पदार्थांची अवैध लागवड, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निलंगा तालुक्यातील बुजरगवाडी शिवारातील शेतात छापा टाकून गांजाची ७ झाडे जप्त केली. गांजाचे एकूण वजन ४६ किलो ८७५ ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत २३ लाख ४३ हजार ७५० रुपये आहे. याप्रकरणी वाघंबर दिगंबर लिंबापुरे, (वय ६०, रा. बुजरगवाडी, ता. निलंगा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमर सुरेश केंद्रे यांना माहिती मिळाली, की बुजरगवाडी येथील वाघंबर लिंबापुरे यांच्या शेतामध्ये गांजाची अवैध झाडे लावलेली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार, शासकीय पंच तसेच आवश्यक तांत्रिक पथकासह शेतात पाहणी केली असता उसाच्या शेतामध्ये गांजाची झाडे लावलेली आढळून आली. यावेळी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून जप्त करण्यात आलेल्या ७ गांजाच्या झाडांचे एकूण वजन ४६ किलो ८७५ ग्रॅम भरले. जप्त गांजाची किंमत प्रति किलो ५० हजार रुपये या प्रमाणे एकूण २३ लाख ४३ हजार ७५० रुपये इतकी आहे. या प्रकरणात वाघंबर दिगंबर लिंबापुरे याच्याविरुद्ध अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम ८(क), २०(ब)(ii)(क) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोलिस ठाणे शिरूर अनंतपाळ यांच्याकडून करण्यात येत आहे.