लातूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
-----
अर्ज मागे घेण्यासाठी होणार ‘घोडेबाजार’?
-
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; कमी उमेदवार असलेल्या जागांवर लक्ष
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. २२ ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्जाची छाननी झाल्यानंतर आता अर्ज कोण मागे घेणार याकडे लक्ष लागले आहे. ज्या मतदारसंघात दोन तीनच उमेदवार राहिले आहेत, अशा ठिकाणी मात्र घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. यात जागा बिनविरोध काढण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत, तर या जागावर निवडणूक कशी लागेल, याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालक मंडळाच्या जागेसाठी निवडणूक होत आहे. अर्ज छाननी झाल्यानंतर केवळ विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख हे प्रक्रिया मतदारसंघातून बिनविरोध निवडून आल्यात जमा आहेत. उर्वरित १८ जागांवर मात्र निवडणूक होत आहे. यात दहा तालुक्यांच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे दहा मतदारसंघ आहेत. तसेच पतसंस्था, मजूर सहकारी संस्था, मत्स्य सहकारी संस्था, अनुसूचित जाती व जमाती सदस्य, इतर मागासवर्गीय सदस्य, विमुक्त जाती भटक्या जमाती सदस्य व महिला प्रतिनिधी असे मतदारसंघ आहेत. महिला प्रतिनिधी मतदारसंघात दोन उमेदवार निवडून द्यायचे आहेत. तर इतर मतदारसंघांत मात्र एकच उमेदवार निवडून द्यायचा आहे. १८ मतदारसंघांत सध्या ७४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख पाच नोव्हेंबर आहे. पंधरा दिवसांचा अजून कालावधी आहे. त्यामुळे आता अर्ज मागे घेण्यासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यात कमी उमेदवार असलेल्या मतदारसंघावर सत्ताधाऱ्यांचे लक्ष आहे. तर दुसरीकडे सर्वच मतदारसंघांत निवडणूक लावण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न आहे.
पाच तालुक्यांवर लक्ष
या निवडणुकीत उदगीर, देवणी, जळकोट, अहमदपूर, चाकूर, रेणापूर या तालुक्यांच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघांत तसेच मत्स्य सहकारी संस्था मतदारसंघात दोन ते तीनच उमेदवार आहेत. त्यामुळे या ठिकाणचे काही उमेदवार अर्ज मागे कसे घेतील, यावर सत्ताधाऱ्यांचे लक्ष आहे. तर संबंधित उमेदवाराने अर्ज मागे घेऊ नये म्हणून विरोधकांचा प्रयत्न असणार आहे.
काकू, पुतण्यात लढाई
निलंगा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. यात सत्ताधाऱ्यांकडून बँकेचे माजी अध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर यांच्या पत्नी संगीता पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजपकडून अरविंद पाटील निलंगेकर हे निवडणूक लढवत आहेत. काकू-पुतण्या असे त्यांचे नाते आहे. याच मतदारसंघात ओमप्रकाश बिरादार हे निवडणुकीत आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ बिनविरोध निघण्याची शक्यता कमी आहे. सरळ लढत होण्याची शक्यता आहे.
सहकारमंत्र्यांची प्रतिष्ठा
या निवडणुकीत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे चुलत भाऊ अविनाश जाधव हे अहमदपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात दिनकर जाधव यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे अविनाश जाधव हे बिनविरोध कसे निघतील याकरिता सहकारमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली पाहायला मिळत आहे.
----