जिल्हा बँकेच्या मतदाराचा ‘भाव’ वधारला
----
अनेक मतदार सहलीला; दोन्ही गटाकडून गिफ्टची मिळाल्याची चर्चा
-----
राम काळगे
निलंगा, ता. ११ : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळासाठी रविवारी (ता. १५) मतदान होत आहे. काही दिवसांवर मतदान आल्याने एक एक मत महत्त्वाचे मानले जात असून, दोन्ही गटांकडून मतदारांना ऐन दिवाळीत सहलीला नेण्यात आले. त्यामुळे निलंगा तालुक्यासाठी काकी-पुतण्याच्या चुरशीच्या असलेल्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत १४ जागांसाठी उमेदवार निवडणूक लढवत असून, माजी मंत्री दिलीपराव देशमुख व सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल ‘शिटी’ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे, तर महायुतीकडून रयतेचे राजे महाराज शिवाजी महाराज परिवर्तन पॅनल पूर्ण शक्तीनिशी ‘कप-बशी’ चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहे. दोन्ही पक्षांकडून मतदान आपणास मिळावे, म्हणून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. निलंग्यात मात्र निलंगेकर विरुद्ध निलंगेकर अशी लढत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे. दोन्ही मतदारांना सहलीवर नेण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या बाजूने मतदान वळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, शिवाय बहुतांश विविध कार्यकारी सोसायटी या काँग्रेसच्या समर्थक असल्याने महायुती मतदान आपल्याला मिळावे म्हणून जोरदार प्रयत्न करत आहेत. मतदाराचा ‘भाव’ही मोठ्या प्रमाणात वधारला असून, मतदारांची पळवापळवी करण्याच्या घटना घडत आहेत. आपलाच विजय ‘फिक्स’ म्हणून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. बँकेची निवडणूक पहिल्यांदाच लागल्याने मतदारांची मनधरणी करावी लागत असून, मतदार सहलीवर गेले असले तरी मतदान करून घेण्यापर्यंतची फिल्डिंग लावण्यात आली आहे.
-----
एकाच उमेदवारावर दोन पक्षांचा दावा
निलंगा तालुक्यातील ६८ गावे औसा विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आल्याने त्या भागातील ४२ विविध सहकारी सोसायटीचे मतदानाकडे लक्ष लागले असून, औसा तालुक्यातून आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून आम्हाला लाभ होणार असे बोलले जात आहे, तर महायुतीकडून पवार या आमच्या उमेदवार आहेत, पहिला महायुतीचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आमदार पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. बहुतांश मतदार अज्ञातस्थळी सहलीवर गेल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे. यामध्ये कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.