गाठला तिशीचा पल्ला, मग घ्या वैद्यकीय सल्ला
-----
लातूर जिल्ह्यात ‘सेवा संकल्प’ अभियान : ५२ हजारांहून अधिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
लातूर, ता. १५ : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या असंसर्गजन्य आजारांवर वेळेत नियंत्रण मिळवण्यासाठी लातूर जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सेवा संकल्प अभियान अंतर्गत ‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ हे १०० दिवसांचे विशेष अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ३० वर्षांवरील सर्व नागरिकांची घरोघरी जाऊन तसेच विविध आरोग्य केंद्रांवर मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे. १७ सप्टेंबरपासून ५२ हजार ६१६ लाभार्थ्यांची मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगासाठी मोफत तपासणी पूर्ण झाली.
मधुमेह, उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन), तोंडाचा कर्करोग, स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग यांसारख्या आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यातच निदान करून रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळवून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अभियानासाठी गाव, वाडी आणि वस्ती पातळीवर आशा स्वयंसेविका, एएनएम, एमपीडब्ल्यू आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांची विशेष पथके प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन नागरिकांची तपासणी करत आहेत.
जिल्ह्यात या सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ सप्टेंबरपासून आतापर्यंत ३० वर्षांवरील ५२ हजार ६१६ लाभार्थ्यांची मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगासाठी मोफत तपासणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात ३० वर्षांवरील एकूण लोकसंख्या १० लाख ६८ हजार ९७१ इतकी असून, त्यापैकी १ लाख ८९ हजार ६०८ उच्च रक्तदाबाचे आणि ९३ हजार २६७ मधुमेहाचे रुग्ण असून त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत. याशिवाय, चालू मोहिमेदरम्यान केलेल्या तपासणीत नव्याने १० हजार ५७९ रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब तर ५ हजार ६८० रुग्णांमध्ये मधुमेह आढळून आला असून त्यांच्यावरही तत्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत.
या अभियानांतर्गत लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात संदर्भित केले जात आहे. तेथे विशेष तज्ज्ञांमार्फत ‘बायोप्सी’ आणि ‘एफएनएसी’ यांसारख्या अत्याधुनिक तपासण्या पूर्णपणे मोफत करून दिल्या जात आहेत. जिल्ह्यातील ३० वर्षांवरील सर्व नागरिकांनी आशा स्वयंसेविका, आरोग्य पथकांकडून किंवा जवळच्या आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्रात जाऊन मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.
-----