LTR14HTP04.jpg लातूर ः येथील माताजीनगर भागात एकास अटक करून जप्त करण्यात आलेले गावठी पिस्तूल. यावेळी पोलिस निरीक्षक अरविंद पवार, गणेश यादव, रवी गोंदकर, खुर्रम काझी आदी.
-----
लातूरमध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक
-----
विवेकानंद चौक पोलिसांची कारवाई; जिवंत काडतूस केले जप्त
------
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १४ ः शहरातील माताजीनगर परिसरात बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला विवेकानंद चौक पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चरणसिंग बंडुसिंग भाट (वय २४, रा. आनंदनगर, लातूर) असे तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ४० हजार पाचशे रुपयांचे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले.
येथील बसवेश्वर चौक ते कव्हा रस्त्यालगत माताजीनगर चौकात मंगळवारी (ता. १३) रात्री हा प्रकार उघडकीस आला. संबंधित तरुणाकडे कोणताही वैध शस्त्र परवाना नसताना त्याच्या ताब्यात गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ७.६५ एमएम बोअरचे गावठी पिस्तूल असून, त्याच्या मुठीच्या दोन्ही बाजूंना काळ्या रंगाची प्लॅस्टिकची ग्रिप आहे. या पिस्तुलाची अंदाजे किंमत ४० हजार रुपये, तर जिवंत काडतुसाची किंमत ५०० रुपये आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार गणेश आनंद यादव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस निरीक्षक अरविंद संभाजी पवार यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक एम.बी. आंधळे करत आहेत.
-----