मेन १
--
फोटो, (ABD26J79430), (ABD26J79432), (ABD26J79433) लातूर : प्रशासकीय इमारत परिसरातील विविध विभागांची एचएसआरपी नंबर प्लेट नसलेली शासकीय वाहने.
----
शासकीय वाहने ‘सुसाट’ अन् सामान्यांना दंड
१ हजार ९७३ वाहनांवर कारवाई; दोन महिन्यांत १९ लाख ४३ हजारांचा दंड वसूल
--
- शासकीय वाहनांवरील जुन्या नंबर प्लेटचा मुद्दा ऐरणीवर
- नियमांच्या अंमलबजावणीत होतोय दुजाभाव?
- एचएसआरपी नंबर प्लेटकडे २८ हजार ९०६ जणांची पाठ
---
सुशांत सांगवे : सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १५ : वाहनाच्या नंबर प्लेटवरून सर्वसामान्यांवर नियमांचा बडगा उगारला जात असताना, त्याच नियमांची अंमलबजावणी शासकीय वाहनांवर होते का, असा सवाल उपस्थित झाला आहे. एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास खासगी वाहनधारकांना एक हजार रुपयांचा दंड भरावा लागत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १,९७३ वाहनांवर कारवाई करून १९ लाख ४३ हजार रुपयांचा दंड वसूल झाला. मात्र, शहरातील अनेक शासकीय वाहनांवर अद्याप जुन्याच नंबर प्लेट दिसत असल्याने ‘नियम सर्वांसाठी समान की सरकारी वाहनांना वेगळे?’ असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. नंबर प्लेट बसवण्यासाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानंतर १ जुलैपासून नवीन नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनांवर कारवाई सत्र सुरू करण्यात आले. कारवाई टाळण्यासाठी अनेक नागरिकांनी आपल्या जुन्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेतली. मात्र, विविध शासकीय विभाग आपल्या शासकीय वाहनांवर अद्याप एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेताना दिसत नाहीत. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना नियम वेगळा आणि सर्वसामान्यांना वेगळा आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
----
दीड लाख जणांनी बसवली नंबर प्लेट
लातूर शहरासह जिल्ह्यातील आजवर १ लाख ४३ हजार २६० जणांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवली आहे. तर १ लाख ६६ हजार १३३ जणांनी नोंदणी अर्ज दाखल केला आहे. पण, २८ हजार ९०६ जणांनी अद्याप नवीन नंबर प्लेटसाठी नोंदणी केली नाही. नियम न पाळणाऱ्या अशा वाहनधारकांवर १ जुलैपासून दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सांगण्यात आले.
---
जिल्ह्यात साडेतीन लाख जुनी वाहने
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. डिसेंबर २०२४ मध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून जून २०२६ पर्यंत पाचवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतीत जिल्ह्यातील वाहन चालकांचा चांगला प्रतिसाद लाभला. २०१९ पूर्वीची ३ लाख ३८ हजार २९९ वाहने जिल्ह्यात आहेत.
----
२ महिन्यांत २० लाखांचा दंड
ज्या वाहनधारकांनी ३० जूनपर्यंत एचएसआरपी प्लेट बसवण्यासाठी ऑनलाइन किंवा आगाऊ नोंदणी केली आहे, अशा वाहनांना या कारवाईतून तात्पुरती सूट देण्यात आली आहे. तर ज्यांनी नोंदणी केली नाही, अशांवर मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १७७ नुसार १ जुलैपासून दंडात्मक कारवाई केली जात आहे. ऑगस्ट अखेर १ हजार ९७३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून दोन महिन्यांत १९ लाख ४३ हजार रुपयांचा दंड जमा झाला आहे.
---
यावर आता निर्बंध
ज्या वाहनधारकांनी आपल्या वाहनांना अद्याप एचएसआरपी प्लेट बसवलेली नाही, अशा वाहनांच्या विविध शासकीय कामांवर परिवहन विभागाने निर्बंध लादले आहेत. त्यानुसार वाहन हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे आणि परवाना नूतनीकरण यांसारखी सर्व महत्त्वाची कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) आता पूर्णपणे थांबविण्यात येत आहेत, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले.
---
आकडे सांगतात...
१ एप्रिल २०१९ पूर्वीची जिल्ह्यातील वाहने : ३,३८,२९९
एचएसआरपी बसवलेले : १,४३,२६०
ऑनलाइन नोंदणी केलेले : १,६६,१३३
अद्याप नोंदणी न केलेले : २८,९०६
---
कोट
एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेणे सर्वांना बंधनकारक आहे. नवीन नंबर प्लेट बसवली नाही असे कुठलेही वाहन असो त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
- विनोद चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी