esakal | जिगरबाज १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, खचून न जाता धीराने सामोरे जाण्याचा सल्ला

बोलून बातमी शोधा

null
जिगरबाज १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, खचून न जाता धीराने सामोरे जाण्याचा सल्ला
sakal_logo
By
जलील पठाण.

औसा (जि. लातूर) : कोरोनाची बाधा झाल्यानंतर अनेकांचे भीतीने हातपाय गळून जातात. काहींनी तर त्या भीतीने आत्महत्या केली. पण, सकारात्मक विचार ठेवले तर सहजतेने कोरोनातून बरे होता येते हे दाखवून दिले ते तालुक्यातील लोदगा येथील १०५ वर्षीय धोंडीराम अंधारे यांनी. त्यांनी केवळ सात दिवसांत त्यांनी कोरोनाला हरविले.

शेतीत कष्ट करून शरीराबरोबरच मनही कणखर असलेल्या श्री. अंधारे यांना गेल्या आठवड्यात कोरोनाने गाठले. त्यांना खोकला, ताप आणि दम लागण्याची लक्षणे दिसून येत होती. कुटुंबीयांनी त्यांची कोरोना चाचणी करून घेतली. अहवाल पॉझिटिव्ह आला. या वयात कोरोनाने संक्रमित झाल्याने कुटुंबीय चिंतेत होते. त्यांना लातूर येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. श्री. अंधारे यांनी धीर सोडला नाही. नियमित उपचाराला ते उत्तम प्रतिसाद देत असल्याने आणि मनाने ते यत्किंचितही खचले नसल्याने औषधींचा चांगला परिणाम त्यांच्या प्रकृतीवर दिसू लागला. उपचार करीत असलेल्या डॉक्टरांशी आणि सेवा देत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी ते सकारात्मक बोलत होते. ‘मला काहीही होणार नाही’ असा त्यांचा ठाम विश्वास होता. या सकारात्मक विचाराने ते सात दिवसांत कोरोनातून बरे झाले. त्यांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. लवकरच त्यांना रुग्णालयातून सुटी मिळणार आहे.

हेही वाचा: गोविंद, अरे गोविंदा!, अशी हाक मी किती वेळा मारली असेल, पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट

शारीरिक कष्ट, निर्व्यसनी, शारीरिक दुर्बलता आणि ज्यांचे मनोबल स्थिर आहे अशा कुठल्याच माणसाला कोणताही आजार त्रासदायक अथवा जीवघेणा ठरत नाही. कोरोनाला सामोरे जाताना या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यात मनोबल हे सर्वांत वरच्या बाजूला येत असल्याने कोरोना झाला म्हणून हतबल होऊ नये. काळजी आणि सुरक्षा जेवढी महत्त्वाची आहे तेवढेच मनोबल उंचावणे गरजेचे आहे.

- डॉ. अंगद जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, औसा.