LTR26B15235 लातूर : ३० व्या लातूर जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांचा गौरव करताना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड व पोलिस अधीक्षक अमोल तांबे.
--
मुख्यालयाची पोलिस क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी
---
मुसीब पठाण व रेशमा गिराम सर्वोत्कृष्ट खेळाडू; स्पर्धेची उत्साहात सांगता
-----
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ११ : पोलिस दलातील शारीरिक क्षमता, जिद्द, शिस्त, खिलाडूवृत्ती आणि संघभावनेचा प्रत्यय देणाऱ्या ३० व्या लातूर जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धेची सांगता पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात झाली. या तीनदिवसीय स्पर्धेत सुमारे १२५ पोलिस अधिकारी, अंमलदार आणि महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला. विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारांत खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. पोलिस मुख्यालयाबरोबरच निलंगा, चाकूर आणि अहमदपूर विभागांच्या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत आपले क्रीडा कौशल्य सिद्ध केले.
पोलिस अधिकारी व अंमलदारांचे शारीरिक, मानसिक आरोग्य सुदृढ राखणे, संघभावना, नेतृत्वगुण आणि परस्पर समन्वय वृद्धिंगत करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता. विविध मैदानी स्पर्धा आणि सांघिक खेळांमध्ये खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीआधारे पुरुष गटात पोलिस अंमलदार मुसीब पठाण, तर महिला गटात पोलिस अंमलदार रेशमा गिराम यांची ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ म्हणून निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध क्रीडा प्रकारांत प्रावीण्य मिळविणाऱ्या खेळाडूंचाही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस उपअधीक्षक (गृह) विजयकुमार शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी (उदगीर) गजानन भातलवंडे, राखीव पोलिस निरीक्षक प्रल्हाद राठोड यांच्यासह क्रीडाप्रमुख सय्यद रौफ, रामलिंग शिंदे, युसूफ अली धावडे, अन्वर शेख, प्रशिक्षक एम.ए. भारती, एस.एम. गजगे, डी.एस. गिरी, एन. नवनाथ थोरात, रियाज सौदागर व तौफिक शेख आदी उपस्थित होते. अब्दुल गालीब शेख यांनी सूत्रसंचालन केले.
--
सांघिक स्पर्धांमधील विजेते संघ पुढीलप्रमाणे
पुरुष गटाचा निकाल :
व्हॉलीबॉल : प्रथम - पोलिस मुख्यालय, द्वितीय - चाकूर विभाग
फुटबॉल : प्रथम - निलंगा विभाग, द्वितीय - अहमदपूर विभाग
बास्केटबॉल : प्रथम - पोलिस मुख्यालय, द्वितीय - निलंगा विभाग
खो-खो : प्रथम - पोलिस मुख्यालय, द्वितीय - अहमदपूर विभाग
कबड्डी : प्रथम - चाकूर विभाग, द्वितीय - पोलिस मुख्यालय
हॅण्डबॉल : प्रथम - निलंगा विभाग, द्वितीय - अहमदपूर विभाग
हॉकी : प्रथम - पोलिस मुख्यालय, द्वितीय - चाकूर विभाग
महिला गटाचा निकाल :
व्हॉलीबॉल : प्रथम - पोलिस मुख्यालय, द्वितीय - चाकूर विभाग
कबड्डी : प्रथम - निलंगा विभाग, द्वितीय - अहमदपूर विभाग
बास्केटबॉल : प्रथम - पोलिस मुख्यालय, द्वितीय - चाकूर विभाग
खो-खो : प्रथम - अहमदपूर विभाग, द्वितीय - निलंगा विभाग