LTR26B14885 लातूर : महात्मा बसवेश्वर महाविद्यालय येथील एनसीसी विभागाचा कॅडेट रामलिंग बाबूराव कोल्हापुरे याचा सत्कार करताना प्राध्यापक.
---
लातुरातील रामलिंगची दिल्लीत सुवर्ण कामगिरी
----
ऑल इंडिया थल सैनिक कँपमध्ये पटकावला दुसरा क्रमांक
-----
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. २२ : लातुरातील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील एनसीसी विभागाचा कॅडेट रामलिंग बाबूराव कोल्हापुरे याने नवी दिल्ली येथे आयोजित प्रतिष्ठेच्या ‘ऑल इंडिया थल सैनिक कँप’मधील ‘जेडीएफएस’ या कौशल्य प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत भारतात दुसरा क्रमांक (रौप्यपदक) पटकावून राज्याचे नाव उज्ज्वल केले. त्याबद्दल कोल्हापुरे याचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
हा कँप एनसीसीमधील अत्यंत कठीण, प्रतिष्ठित आणि लष्करी कौशल्यांची परीक्षा घेणारा राष्ट्रीय स्तरावरील कँप मानला जातो. याद्वारे कॅडेट्समध्ये लष्करी शिस्त, नेतृत्वगुण, नकाशा वाचन, शस्त्र हाताळणी, अंतर अंदाज व मैदानी संकेत व आरोग्य-स्वच्छता यांसारख्या सैनिकी कौशल्यांची कठोर पारख केली जाते. हा कँप महासंचालनालय एनसीसी (नवी दिल्ली) यांच्याद्वारे दरवर्षी आयोजित केला जातो. नवी दिल्ली येथे डी.जी. एनसीसी कँप, परेड ग्राउंड येथे हा कँप झाला. देशभरातील १७ एनसीसी डायरेक्टोरेट्स (निर्देशालये) मधून निवडून आलेले सुमारे एक हजार ५०० हून अधिक सर्वोत्तम कॅडेट्स या स्पर्धेत सहभागी झाले होते. भुईसमुद्रगा या छोट्याशा गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या रामलिंगने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष आदिनाथ सांगवे, सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांच्यासह प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. नल्ला भास्कर रेड्डी, उपप्राचार्य प्रा. नितीन वाणी, डॉ. गुणवंत बिरादार, डॉ. सुजित हांडीबाग, नामदेव बेंदरगे यांनी त्याचे अभिनंदन केले.