लातूर : रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने आयोजित स्पर्धेत चित्र रेखाटण्यात तल्लीन झालेले विद्यार्थी.
-
विद्यार्थी रमले रंगरेषांच्या दुनियेत
---
लातूरमध्ये कांतिलाल कुचेरिया यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लबतर्फे चित्रकला स्पर्धा
-
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. २० : कांतिलाल कुचेरिया यांच्या स्मरणार्थ गेली ३२ वर्ष सातत्याने रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन पहिली ते दहावीपर्यंतच्या शहरातील सव्वाशेच्या वर शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी यात सहभागी झाले होते. वेगवेगळे चित्र रेखाटण्यात आणि त्यात रंग भरण्यात मुले रमली होती.
रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या श्रीकिशन सोमाणी हायस्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी उपशिक्षणाधिकारी सुशील फुलारी, रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष रमेश चिल्ले, रोटरीयन संजय बोरा, योगेश काळे, सचिव उमेश पत्रावळे, गिरीश पेन्सलवार, सुनील परांडेकर, अमोल बनाळे, पियुष कुचेरिया, माधुरी चिल्ले, प्रणिता उटगे, सारिका गांधी, जयश्री बारपुते आदी उपस्थित होते.
फुलारी यांनी, मुलांमध्ये ऊर्जा आणि ऊर्मी असते. ती त्यांना सर्जनशील काहीतरी करायला भाग पाडते. कलेला जात, रंग, धर्म किंवा देशाच्या सीमा बंदिस्त करू शकत नाहीत, असे सांगितले.
रमेश चिल्ले यांनी, चित्रकला स्पर्धेसाठी बऱ्याच शाळामधील कलाशिक्षक मुलांकडून कसून तयारी करून घेऊन या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. टीव्ही, मोबाइलच्या स्क्रीनपासून मुलांना दूर करून त्यांच्यातील सर्जनशीलतेला बाहेर काढण्याचे काम यानिमित्ताने रोटरी क्लब करत आहे, असे नमूद केले.
संजय बोरा यांनीही मनोगत व्यक्त केले.