LTR26B15586
लातूर : अनाथ बालक व वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक ांसोबत दिवाळी साजरी करताना रोटरी सॅटेलाइट क्लब ऑफ लातूर ॲस्पिरेशनचे पदाधिकारी.
--
दीपोत्सवातून माणुसकीचा सुगंध
-------
लातूर, ता. ८ : दीपावली म्हणजे केवळ दीपप्रज्वलन, रोषणाई आणि आनंदोत्सव नव्हे, तर माणुसकीच्या नात्यांना उजाळा देणारा, प्रेम, आपुलकी आणि संवेदनशीलतेचा सुगंध दरवळविणारा मांगल्यपर्वाचा सोहळा! आपल्या आनंदाच्या प्रकाशात समाजातील वंचित, निराधार आणि गरजू घटकांच्याही आयुष्यात सुखाचे दीप उजळावेत, या उदात्त भावनेतून रोटरी सॅटेलाइट क्लब ऑफ लातूर अस्पिरेशनच्या वतीने दीपावलीनिमित्त एक स्तुत्य सामाजिक सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत खुशी ग्राम येथील विविध स्तरातील आणि अनाथ बालकांना तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक यांना दीपावलीनिमित्त फराळ आणि जीवनावश्यक धान्यसामग्री (शिधा) यांचे वाटप करण्यात आले. आयुष्याच्या संध्याकाळी सोबतीच्या आणि मायेच्या शब्दांची आस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसोबत, तसेच बालपणातच परिस्थितीच्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या चिमुकल्यांसोबत आनंदाचे क्षण वाटून घेत क्लबच्या सदस्यांनी माणुसकीच्या नात्यांची उब अनुभवली. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे हास्य आणि डोळ्यांतील आनंदाची चमक हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती ठरली. सण-उत्सवांचे खरे सार हे केवळ वैयक्तिक आनंदात नसून, तो आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यात आहे, हा संवेदनशील संदेश या उपक्रमाने अधोरेखित केला.