जळीत उसाच्या गाळपासाठी
कारखान्यांनी कार्यवाही करावी
-----
लातूर, ता. १८ : लातूर ग्रामीणमधील एकुर्गा येथील बालाजी घुटे आणि वाकडी येथील नागनाथ सोमासे यांच्या शेतातील आगीमुळे नुकसान झालेल्या ऊस पिकाची माजी आमदार धीरज देशमुख यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच, जळीत उसाचे गाळप करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित साखर कारखान्यांना दिल्या.
शेतकरी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने पीक उभे करतात. मात्र, आगीसारख्या संकटामुळे डोळ्यांसमोर उभे असलेले पीक जळून खाक झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांच्या कष्टांची आणि भावनांची जाणीव असून, अशा कठीण प्रसंगी त्यांना आधार देणे आवश्यक आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
संकट कितीही मोठे असले, तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही. त्यांच्या दुःखात सहभागी होऊन दिलासा देण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव पाठीशी उभे राहू, असा विश्वास देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिला.
दरम्यान, शेतातील आगीच्या घटना टाळण्यासाठी महावितरणनेही दक्षता घ्यावी. आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची मोहीम हाती घेऊन पथके नियुक्त करावीत. शेतकऱ्यांकडून येणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन वीज यंत्रणेची दुरुस्ती करावी, जेणेकरून संभाव्य नुकसानीच्या घटना टाळता येतील, अशा सूचनाही त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
-----
LTR26B15376
लातूर : जळीत उसाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देताना धीरज देशमुख.